
दोडामार्ग : दोडामार्गातील सार्वजनिक गणेशोत्सवाची आतापर्यंत एक वेगळीच सुंदर ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये असून यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव देखील दोडामार्गात अतिशय शांत व उत्साही वातावरणात संपन्न होईल असे प्रतिपादन सावंतवाडी चे पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक श्री कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सकाळी झाली.
या बैठकीला दोडामार्ग शहरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आनंद कामत, भेडशी येथील नंदू टोपले, गोलम तसेच साटेली, आयी, वगैरे कडील गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. दोडामार्ग शहरातील सार्वजनिक गणपती हा बाजारपेठ परिसरात असल्याच्या पार्श्वभूमीवर हॉल परिसरात तसेच बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय गणपती हॉल कडून सुरु होणाऱ्या इतर मिरवणुकांना परवानगी देण्यापूर्वी मिरवणुका काढणाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाला पूर्वकल्पना देण्याकडे पोलिसांचे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
मंडळाच्या स्वयंसेवकांसोबत होमगार्ड तसेच पोलीस , व्यापारी, नागरिक यांनी एकमेकांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यावर उपस्थित सर्वांनी भर दिला. यावेळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, तळकटकर हे देखील उपस्थित होते. पोलीस समीर सुतार यांनी आभार मानले.