नवरात्र उत्सव मंडळांच्या बैठकीत कुडाळ पोलिस अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 12, 2023 11:24 AM
views 139  views

कुडाळ : नवरात्र उत्सव काळात नवरात्र उत्सव असलेल्या ठिकाणी, गरबा दांडिया परिसरात अनोळखी व्यक्तींना, व्यसनी लोक प्रवेश देऊ नये, आक्षेपार्ह पोस्टर्स, बॅनर लावू नये, उत्सवाच्या ठिकाणी आक्षेपार्ह देखावे उभारू नये तसेच उत्सव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत अशा उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात झालेल्या नवरात्र उत्सव मंडळांच्या बैठकीत दिल्या. 

        कुडाळ तालुक्यातील १४ नवरात्र उत्सव मंडळांची व रास गरबा मंडळांची बैठक कुडाळ पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी घेण्यात आली. ही बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे व कुडाळ पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कुडाळ तालुक्यातील बहुतांशी नवरात्र मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीम.गावडे यांनी सांगितले की, नवरात्र काळात रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असा मंडप उभारू नये, सर्व मंडळांनी ध्वनीक्षेपक व वेळेचे बंधन पाळावे, मंडप तसेच ध्वनीक्षेपक यासाठी आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात. या उत्सवात आक्षेपार्ह बॅनर, पोस्टर्स लावल्यास कारवाई करण्यात येईल. उत्सव परिसरात छेडछाड करणाऱ्या व व्यसनी लोकांना प्रवेशच देऊ नये. अनोळखी ईसम यांच्या बाबत आवक्षक ती दक्षता घ्यावी. यासाठी परिसरात सक्षम असे सुरक्षा रक्षक दिवस- रात्र नेमण्यात यावेत. आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी घेण्यात यावी. दानपेटी व आवक्षक बाबींची काळजी घ्यावी. उत्सवात सामाजिक सलोखा जपणारे कार्यक्रम घेऊन त्यात पोलीसांना सहभागी करून घेण्यात यावे अशा विविध विषयांवर मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच मंडळांशी चर्चात्मक संवाद साधला.

यावेळी पोलीस संजय कदम, रूपेश सारंग उपस्थित होते. यावेळी उपस्थित मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.