शेतकऱ्यांसाठी महत्वाचं

या ठिकाणी खते - बियाणे उपलब्ध
Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2025 17:27 PM
views 129  views

सावंतवाडी : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागतील. यापार्श्वभूमीवर, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक खते, विविध प्रकारची भात बियाणे आणि कीटकनाशके उपलब्ध करून ठेवली आहेत अशी माहिती संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी दिली.


विविध ठिकाणी उपलब्धता

प्रमोद गावडे यांनी सांगितले की, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या मुख्य कार्यालयासह, माठेवाडा गोदाम, मळगाव, मळेवाड, कास, सातार्डा आणि आरोस येथील शाखांमध्ये ही खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या मागणीनुसार त्यांनाही खते, बियाणे आणि कीटकनाशके पुरवण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या बियाण्यांची उपलब्धता

गतवर्षी जास्त मागणी असलेली रत्नागिरी ८, मसुरी, सुवर्णा, पंकज आणि शुभांगी या भात बियाण्यांसह, यंदा कर्जत २, पंकजा घाटी, वालय, कोलम, मोगरा, सोनम, रूपाली, श्री १०१, वाडा कोलम, अराईज ६४४४ अशा विविध प्रकारची भात बियाणे उपलब्ध आहेत. यासोबतच, शेतकऱ्यांसाठी आवश्यक खते आणि कीटकनाशकेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लवकर तयारीचे आवाहन

यंदा मृग नक्षत्रापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी लवकरच शेतीच्या मशागतीला सुरुवात करतील, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांना वेळेवर साहित्य मिळावे यासाठी नियोजन केले आहे, असे प्रमोद गावडे यांनी नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे.