कच-यातून कल्‍पकता स्पर्धा मोठया गटात मकरंद वेंगुर्लेकर - संस्‍कार शारबिद्रे

लहान गटात आराध्‍य मुणनकर प्रथम
Edited by: दिपेश परब
Published on: September 25, 2024 14:18 PM
views 208  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कच-यातून कल्‍पकता स्पर्धेत मोठया गटात मकरंद वेंगुर्लेकर व संस्‍कार शारबिद्रे तर लहान गटात आराध्या मुणनकर यांनी प्रथम क्रमांक पटकावले. पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी अशा  दोन वयोगटात कच-यातील टाकावु वस्‍तूंपासून टिकावू व आकर्षक कलाकृतींवर आधारीत ही स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती.

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) ही मोहीम देशात दि. १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्‍यात येत आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. आज बुधवारी (२५ सप्टेंबर) येथील स्‍वामी विवेकानंद सभागृह वेंगुर्ला येथे ही "कच-यातून कल्‍पकता स्पर्धा" आयोजित करण्‍यात आली होती. या स्‍पर्धेच्‍या पहिली ते पाचवी या लहान वयोगटामध्‍ये ७८ स्पर्धक सहभागी झाले होते. या लहान गटात आराध्‍या रमेश मुणनकर (सिंधुदुर्ग विदयानिकेतन‍ इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला) हिने शिणाणे शिंपल्यापासून बनविलेल्या आकर्षक मेणबत्तीच्‍या कलाकृतीने प्रथम क्रमांक प्राप्‍त केला.  तर सिया भरत गावडे (सिंधुदुर्ग विदयानिकेतन‍ इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला) हिने करंवटी, लाकडी वस्‍तू व प्‍लॅस्‍टकीचा वापर करुन ब‍नविलेल्‍या शोभीवंत कलाकृतीला द्वितीय क्रमांक आणि श्रेयांश सचिन सावंत (सिंधुदुर्ग विदयानिकेतन‍ इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला) हिने काचेच्‍या बॉटल व कागदी पुठयावर नक्षीकाम केलेल्‍या कलाकृतीने  तृतीय क्रमांक प्राप्‍त केले. 

सहावी ते दहावी या वयोगटामध्‍ये २७ स्पर्धक सहभागी झाले होते. या मोठ्या गटात मकरंद वेंगुर्लेकर व कु. संस्‍कार शारबिद्रे (रा.कृ.पाटकर हायस्‍कूल वेंगुर्ला) यांनी प्‍लॅस्‍टीक बॉटल व पुठयांचा वापर करुन बनविलेल्‍या ७० किलो वजन क्षमतेच्‍या खुर्चीला प्रथम क्रमांक मिळाला. तर  कु. काव्‍या मारुती कुडाळकर (पूर्ण प्राथमिक शाळा नं. ३) हिने लाकडी वस्‍तू व टाकावू जाळी, नायलॉन दोरी व कागद यांचा वापर करुन बनविलेल्‍या नौकेला द्वितीय क्रमांक आणि आर्या गोपाळ चेंदवणकर (एम.आर.देसाई इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला ) हिेने प्‍लॅस्‍टीक बॉटलचा वापर करुन बनविलेल्‍या कलाकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. 

शालेय विदयार्थ्‍यांना कच-याचे महत्‍व पटवून देवून कच-याचे पुर्नवापर आकर्षक व नाविन्‍यपूर्ण कलाकृती बनविण्‍यासाठी होवू शकतो याबाबतची जनजागृती करण्याच्या मुख्‍य उद्देशाने कच-यातून कल्‍पकता स्पर्धा ही स्पर्धा आयोजित करण्‍यात आली होती तसेच भविष्‍यात स्वच्छतेबाबत याप्रकारचे नाविनयपूर्ण उपक्रम वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत राबवण्यिात येतील यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त विदयार्थ्‍यांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी यावेळी व्‍यक्‍त केले. तसेच गुरुवार दिनांक २६/०९/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या कलाकृतीचे प्रदर्शन ठेवण्‍यात आलेले असून जास्‍तीत जास्‍त नागरीकांनी  याचा  लाभ घ्‍यावा असे आवाहनही  मुख्‍याधिकारी रितोष कंकाळ यांनी केले आहे.