
सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकाने जुना बांदा - पत्रादेवी रोड आरोसबाग तिठ्याजवळ अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे ६ लाख १६ हजार ९६० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार जुना बांदा पत्रादेवी रोड, आरोसबाग तिठ्याजवळ रविवारी संध्या 7.30 वाजताच्या दरम्यान अवैध मद्य वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी केली.
यावेळी पांढऱ्या रंगाचे हुंडाई कंपनीचे एक्सेंन्ट चारचाकी वाहन क्र. MH-47-N-1424 या वाहनाची तपासणी केली असता या चारचाकी वाहनाच्या पाठीमागील सीटवर व डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ग्रॅन्डच्या 180 मि.ली मापाच्या काचेच्या 1200 सिलबंद बाटल्या (25 बॉक्स) अवैध मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी वाहन चालक संग्राम विक्रम सिंघ, वय 31 वर्षे, रा. मालाड मुंबई यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्यामध्ये अं. रु.2,16,960/- किंमतीचे मद्य व रु.4,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अं. रु.6 लाख 16 हजार 960/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई प्रभारी निरीक्षक प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रणजीत शिंदे, दिपक रामचंद्र वायदंडे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास प्रदिप रास्कर, प्रभारी निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.