उंचीत शिथिलता मिळाल्यास सैन्य भरतीत दोडामार्ग मधील तरुणांना मोठी संधी : बुधाजी मोरगावकर

Edited by: संदीप देसाई
Published on: February 21, 2024 13:28 PM
views 59  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील तरुणांना सैन्यात नोकरीची संधी मिळण्यासाठी निर्धारित उंची नियमात गोरख्या प्रमाणे शिथिलता असणे आवश्यक  असल्याचे मत मुंबईस्थित सेवा निवृत्त अधिकारी बुधाजी मोरगांवकर यांनी व्यक्त केलंय.

दोडामार्ग तालुक्यातील तरुण आवश्यक उंची अभावी सैन्य भरतीत मागे पडत आहेत. त्या तरुणांना उंचीत गोरखा तरुणां प्रमाणे शिथिलता मिळाल्यास चित्र बदलेल  असं मत मोरगांवकर यांनी व्यक्त केलय. ठाणे येथे एका सेल्फ एम्प्लॉयमेंट निर्मिती शिबिरात बोलताना त्यांनी आपले हे मत मांडले आहे. अगदी सुरवातीला तळ कोकणातील  तरुणांना गोरख्यां प्रमाणे सैन्य भरतीत उंचित शिथिलता मिळत असल्याची बाबही त्यांनी यावेळी बोलतांना अधोरेखित केली. याचा परिणाम दोडामार्ग मधील तरुण त्याकाळी मोठ्या प्रमाणात सैन्यात असल्याचे दिसत होते. मात्र कालांतराने सैन्य भरती सावंतवाडी व रत्नागिरी येथे होऊ लागल्या. त्या ठिकाणी पाहिजे त्या उंचीचे तरुण मिळू लागल्याने दोडामार्ग येथिल तरुण सैन्य भरतीत दुर्लक्षित राहिला. या ठिकाणी डोंगराळ परिसर आहे. दोडामार्ग तालुक्यातील तरुण उंचीला कमी असणे ही त्यांची चुकी नाही याला तेथिल भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे, असेही मोरगांवकर म्हणाले. 

पूर्वी गोरखा तरुणासाठी कमीत कमी उंची १५२ सेंटीमीटर म्हणजेच ५ फूट असावी असा नियम होता. आणि डोंगराळ भागातील तरुणासाठी उंची १५७ सेंटीमीटर म्हणजेच ५ फूट २ इंच असावी असा नियम होता. दोडामार्ग येथिल तरुणासाठी डोंगराळ भागाचा म्हणजेच ५ फूट २ इंच उंचीचा नियम लागू होता.  डोंगराळ भागातील तरुण धाडशी मानले जात होते. त्यामुळे उंची काही प्रमाणात कमी असली तरी त्यांना सैन्यात संधी देण्यात यावी. असे ब्रिटिश अधिकाऱ्याचे म्हणणे होते. त्यामुळे या ठिकाणचे तरुण सैन्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी म्हटलय. गोरखा प्रवर्गात अजूनही उंचीत शिथिलता असून ५ फुट उंचीचा गोरखा तरूण सैन्यात भरती होत आहे. 

मात्र काही वर्षापासून आपल्या भागासाठी सैन्य भरतीत उंचीची मर्यादा वाढवली गेली. कमीच कमी उंची १६८ सेंटिमीटर महणजेच ५ फूट ६ इंच उंची असावी असा आता नियम आला आहे. भरतीच्या वेळी तर ही मर्यादा अजून वाढवली जाते, असेही समजत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

दोडामार्ग येथे योग्य उंचीचे उमेदवार भेटत नसल्याचे सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा गैरसमज झाल्याने दोडामार्ग येथे सैन्य भरती होणे कित्येक वर्षापासून बंद झाले आहे.  तदनंतर सन २००४ मध्ये दोडामार्ग तालुका विकास मंडळाचे पदाधिकारी कर्नल दर्ज्याच्या अधिकाऱ्याला कोल्हापूर येथे भेटून सैन्य भरती दोडामार्ग येथे भरती आयोजित करण्यासाठी विनंती केली होती. माञ दोडामार्ग येथे भरती आयोजित करण्यासाठी अधिकारी तयार नसल्यासचे लक्षात आल्याने  ही भरती गोवा येथे आयोजित करण्यात यावी असा आग्रह विकास मंडळाकडून धरण्यात आला होता.

आणि त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून कर्नल दर्ज्याच्या सैन्य अधिकारी यांची मनधरणी करण्यात विकास मंडळाच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे २००५ मध्ये दोडामार्गसाठी गोवा येथे सैन्य भरती लावण्यात आली  होती. दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त तरूण भरती साठी उपस्थित राहिले. त्यामुळे एकाच भरतीत त्यावेळीं दोडामार्ग तालुक्यातील ५८ तरुण सैन्यात भरती झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येत दोडामार्ग तालुक्यातील तरूण सैन्यात भरती होण्याची काही दशकातील ती पहिलीच घटना मानली गेली. त्या वेळी ऊंचीत ५ फूट २ इंचची शिथिलता मिळाली असती तर त्या वेळी ५०० पेक्षा जास्त तरुण भरती झाले असते. कारण या भरतीतून सैन्यात त्यावेळी १५०० जवान भरती करावयाचे होते.

सध्यातर रोजगाराची सर्वच ठिकाणी मारामारी आहे. सरकारी नोकरी मिळणे तर फार अवघड झाले आहे. हा सर्व विचार करून आणि दोडामार्ग तालुक्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळावी या साठी पुन्हा दोडामार्गसाठी सैन्य भरती लावण्यासाठी सैन्य खात्याला विनंती करू आणि उंचीत शिथिलता मिळाल्यावरच या भरती कॅम्प साठी आग्रही राहू असेही मोरगांवकर यांनी स्पष्ट केलं आहे.  उंचीचा नियम पूर्वरत करण्यासाठी स्थानिक खासदार यांचे माध्यमातून हे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.