
दोडामार्ग : आडाळीत उद्योग उभारणीसाठी किती उद्योजकांनी कोणत्या अटीशर्थी ठेवल्या आणि गोल्फ प्रोजेक्ट कंपनीने त्या अटींची पूर्तता करण्याची काय तयारी दर्शवली, याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर करावी, अशी मागणी आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष व सरपंच पराग गावंकर आणि सचिव प्रवीण गावंकर यांनी केली आहे.
“आम्ही जमीन उद्योग उभारणीसाठी दिली आहे. रिसॉर्ट, हॉटेल, गोल्फ कोर्स उभारून स्थानिकांना केवळ वॉचमन–ड्रायव्हरचाच रोजगार मिळावा, ही मानसिकता आम्ही खपवून घेणार नाही,” असा कठोर इशाराही समितीकडून देण्यात आला.
कृती समितीच्या वतीने गावंकर म्हणाले की, “काही दिवसांपूर्वीच आम्ही संशय व्यक्त केला होता की आडाळीतील बहुतांश जमीन गोल्फ कोर्स व हॉटेलसाठी एका रिअल इस्टेट कंपनीला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन भूखंड मागणी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आधीच भूखंड घेतलेल्या उद्योजकांची परवानगी प्रक्रिया होल्ड ठेवण्यात आली आहे. अखेर उद्योगमंत्री सामंत यांनीही त्याचीच घोषणा केली.”
गोल्फ प्रकल्पासाठी जमीन देण्यामागे ‘उद्योजक अटीशर्थी ठेवत आहेत’ हे मंत्री सामंत यांनी दिलेले कारण “हास्यास्पद” असल्याचे समितीचे म्हणणे आहे. “गेल्या तीन वर्षांत शेकडो उद्योजक आडाळीत उद्योग उभारणीसाठी इच्छुक होते. आजही सुमारे 50 उद्योजक भूखंड घेऊन बसले आहेत, पण महामंडळ प्रशासन त्यांच्या परवानग्यांमध्ये अडथळे आणत आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत,” असा आरोप करण्यात आला.
समितीने उद्योगमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे
“सामंत यांनी आडाळीत यावे. त्यांच्या समोर ग्रीन कॅटेगरीतील उद्योजकांची परेड आम्ही घडवून आणू. दोन महिन्यांसाठी ‘स्पेशल विंडो’ सुरू करून सर्व परवानग्या द्या; आम्ही दोन महिन्यांत शंभर उद्योजक आडाळीत आणून दाखवू. त्यांच्याकडून कोणत्याही अटीशर्थी असणार नाहीत; फक्त तुम्ही तुमच्या अटी बाजूला ठेवा.”
आडाळीत किमान 800 रोजगार निर्माण करणारे उद्योग आधीच आले असूनही जमीन घेऊन बसलेले उद्योजक परवानगीअभावी अडचणीत आहेत. “या नकारात्मक परिस्थितीला जबाबदार कोण?” असा सवाल समितीने उपस्थित केला.
“गोल्फ कोर्ससाठी शेकडो एकर जमीन दिली तर रोजगार वॉचमन-चौकीदारांच्या पलीकडे जाणार नाही. पण त्याच जागेत शेकडो लघुउद्योग आल्यास हजारो स्थानिकांना तांत्रिक रोजगार मिळू शकतो. आम्ही विकासाच्या बाजूचे आहोत. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ नये; परंतु विकासाच्या मार्गात अडथळे आणले तर संघर्ष अपरिहार्य होईल,”असा सज्जड इशारा गावंकर यांनी दिला.











