
कुडाळ : वेगवेगळ्या कलाकारांच्या संकल्पनेतून, त्यांच्या हातातून वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या या ठीकाणी तयार झाल्या आहेत. आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ७० ते ८५ हजार खाजगी मुर्तींचे पूजन केलं जातं. त्यातील १५ ते २० हजार पारंपारिक पाट असतील, पण उरलेल्या ६० ते ६५ हजार मूर्तींचं प्रदर्शन झालं पाहिजे. गणेशोत्सव काळात पेणहून गणेश मूर्ती येतात पण आपल्या जिल्ह्यात जर गणेश कला उपजत असेल तर त्या कलेचं प्रदर्शन झालंच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांनी ओंकार डिलक्स हॉल कुडाळ येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ, सिंधुदुर्ग व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा दि. ११ ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी गणेश मूर्ती घडत असतानाचे प्रात्यशिक घोटगे येथील मुर्तीकार अशय मेस्त्री यांनी दाखविले. त्याअगोदर मूर्ती घडविण्यासाठी आणलेल्या मातीचे पुजन जेष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पत्रकार संतोष राऊळ, महेश सरनाईक, बाळ खडपकर, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, जिल्ह्यातील मूर्तिकार तसेच कुडाळमधील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.