
सावंतवाडी : सर्वांना सोबत घेऊन सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार तसेच शहरात विकासाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढविण्याचे कामही करणार असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केला. जात-पात अथवा धर्म न पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजप जबाबदारी देते. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला दिलेल्या संधीच मी सोनं करेन, पारदर्शक कामकाज करू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲड. निरवडेकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे मी आभार मानतो. तसेच भाजपचे नेते विनोद राऊळ, माजी नगरसेवक विलास जाधव यांचे व नगरसेवक, प्रभाग १० मधील मतदारांचे विशेष आभार मानतो. भारतीय जनता पार्टी कोणताही जात-पात अथवा धर्म न पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही जबाबदारी देते हे आज पुन्हा एकदा दिसून आले. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंसह येणाऱ्या काळात सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने चालवला जाईल. नागरिकांच्या कामात कोणत्याहीबाबतीत दिरंगाई केली जाणार नाही. सर्व नियमांचे पालन करूनच कामकाज होईल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, सध्या शहरात सुरू असलेली पाईपलाईनची कामे नियमानुसार आणि योग्य पद्धतीने होतील याची आम्ही दक्षता घेऊ, ठेकेदारांना तशा सक्त सुचना आम्ही दिलेल्या आहेत. नियमानुसार काम होत असतील तरच ती सुरू ठेवण्यात येतील. अन्यथा, अशी कामे थांबविण्यात येतील. तर जिथे रस्ते खोदले आहेत तिथे काम झाल्यानंतर डांबरीकरण केलं जाईल. धुळीच साम्राज्य पसरू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. तसेच सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक कामे करण्यावर आमचा भर राहील असं मत व्यक्त केले.
तसेच कचरा डेपोवर काही स्टाफ कमी आहे. मात्र, त्या ठिकाणी कामही सुरू आहे. परंतु, कचरा डेपोवरून संजू परब यांनी केलेल्या टीकेबाबत आम्हाला वाईट वाटले. ते नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी त्यांनी पार्टी केल्याचे म्हटले होते. पण, आता त्यांना पार्टी करता येत नसल्याच वाईट वाटत असा टोला त्यांनी हाणला. तर पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा म्हणून आम्ही पाठपुरावा केला आहे. येत्या महिन्याभरात तो मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर आदींसह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











