
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका सेवा खाजगी रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी विशेषबाब म्हणून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ॲड. रुजूल पाटणकर यांनी केली आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना सकारात्मक धोरण ठरवण्याची विनंती केली आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असते. काही ठिकाणी अंतर जास्त असल्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र, अशा परिस्थितीत जर रुग्णाची प्रकृती अधिक खालावली आणि त्याला पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी किंवा जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आली तर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. १०८ च्या नियंत्रण कक्षाकडून आम्ही खाजगी रुग्णालयात सेवा देत नाही, असे सांगितले जाते. ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. ॲड. पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, खाजगी रुग्णवाहिकांचा खर्च गोरगरीब रुग्णांना परवडणारा नसतो. खाजगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी आणि जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ही सेवा रुग्णांना मोफत मिळू शकेल. या संवेदनशील विषयावर पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.










