
दोडामार्ग : घोरपड प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्यास वनविभागाने अटक केली आहे. राजन पांडुरंग सावंत असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून मृत घोरपड हातात पकडून सोशल मीडियावर त्याचे फोटो वायरल केल्याने ही घटना उघडकीस आली. त्याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत याने घोरपडीची शिकार करून मृता वस्तीत असलेल्या घोरपडीला हातात पकडले व त्याचे फोटो फेसबुक या सोशल मीडिया वरून व्हायरल केले. ही बाब वनविभागाच्या निदर्शनास येताच त्याबाबतची पडताळणी सुरू झाली. अखेर संशयित राजन सावंत याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले.
उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, कोनाळ वनपाल किशोर जंगले, वनरक्षक सुशांत कांबळे, अजित कोळेकर, मयुरेश करंगुटकर, शुभम वारके, वनमजूर रामराव लोंढे यांनी ही कारवाई केल्याची माहिती वनविभागाने दिली.