मसणवट भूमीवरील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण

Edited by: लवू परब
Published on: September 17, 2025 20:21 PM
views 30  views

दोडामार्ग : पिकुळे शेळपीवाडी येथील मसणवट भूमीवरील अतिक्रमण काढावे. पिढ्यानपिढ्या चालू असलेला दाढ रहदारीचा बंद केलेला रस्ता खुला करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लवू रामा नाईक यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी सकाळी आमरण उपोषणास सुरुवात केली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्याने हे उपोषण सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

आमरण उपोषणास बसण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. त्या निवेदनात म्हटले आहे, गट क्रमांक व उपविभाग २१४ मधील मसणवट (क्षेत्रफळ ०.३९ हे.) या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांना ग्रामपंचायत पिकुळेने पाठबळ दिल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच भागातून पिढ्यानपिढ्या स्थानिक ग्रामस्थ रहदारीसाठी वापरत असलेला सार्वजनिक रस्ता अचानक २७ जुलै २०२४ रोजी एका व्यक्तीने जबरदस्तीने बंद केला. या संदर्भात ग्रामसभा, तंटामुक्ती बैठक, ग्रामपंचायतीची मासिक सभा अशा सर्व ठिकाणी एकमताने रस्ता पूर्ववत खुला करावा, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत अद्यापही कोणतीही कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने १७ सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी बुधवारी सकाळपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत धर्मा नाईक व राजू नाईक हेही उपोषणाला बसले.