जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ रोजी बौद्ध समाजाचा विराट मोर्चा

बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ मोर्चा
Edited by:
Published on: April 25, 2025 17:05 PM
views 140  views

सिंधुदुर्गनगरी : बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी २८ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्हा  बुद्धीस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गातील बौद्ध समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती फेडरेशनचे संदीप कदम यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली आहे. 

येत्या सोमवारी, २८ एप्रिलला सिंधुदुर्ग नगरीत सिंधुदुर्गातील बौद्ध समाजाची अभूतपूर्व एकजूट दिसून येणार आहे. जिल्ह्यातील बौद्धांच्या तमाम धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक तसेच शैक्षणिक संघटनांनी दि बुद्धीस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग या महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताबरोबरच जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र स्थान असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध भिक्खुंनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी हा मोर्चा होत आहे. या मोर्चाद्वारे बोधगया टेम्पल कायदा (बीटीए), १९४९, रद्द करण्यात यावा व महाबोधी महाविहार हे पवित्र स्थळ पूर्णत:  बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीचे निवेदन भारताचे  राष्ट्रपती, पंतप्रधान व बिहार राज्याचे  मुख्यमंत्री यांना जिल्ह्याधिकारी यांच्यामार्फत निवेदन देणार येणार आहे. जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचा हा मोर्चा अभूतपूर्व होणार असून या मोर्चाला बौद्ध बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे बुद्धीस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या निमंत्रक समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार मुक्तीआंदोलनासाठी देशभरातील भिक्खुंचे आंदोलन सद्या सुरु आहे. या आंदोलनाला जगभरातील बौद्धांचा व बौद्ध भिक्खुंचा पाठींबा मिळत आहे. देशभरामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला समर्थन दिले जात आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यातील बौद्ध बांधव आपल्या पवित्र धार्मिक स्थळाच्या मुक्तीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मोर्चे काढून मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहेत. याच समर्थनासाठी सिंधुदुर्गातील बौद्ध बांधव सिंधुदुर्ग नगरीत आयोजित केलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने शांततेने सहभागी होवून  जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता होणार आहे.

बोधगया हे बौद्ध धर्माच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. इतर पवित्र स्थळांमध्ये बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी, दुसरे आहे सारनाथ,तिसरे आहे कुशीनगर. कुशीनगरमध्ये भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. बिहारमध्ये जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगया आहे. जिथे भ.बुद्धांना दु:खमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले. बोधगया येथील महाबोधी महाविहार हे भारताबरोबरच जगभरातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मात्र जगभरातील बौद्धांसाठी वंदनीय असणा-या पवित्र स्थळावर सध्या ब्राम्हण/आचार्यांचा कब्जा आहे.

१९४९च्या बोधगया टेंपल कायद्यातील बोधगया महाविहार व्यवस्थापन समितीच्या रचनेबाबतच्या  अन्यायकारक तरतुदींमुळे महाबोधी महाविहार या बौद्धांच्या पवित्र स्थळावर  ब्राह्मण पंडीत आचार्य यांनी कब्जा मिळविला आहे. म्हणूनच बोधगया टेम्पल कायदा (बीटीए), १९४९ रद्द करण्यात यावा व महाबोधी महाविहार हे पवित्र स्थळ पूर्णत:  बौद्धांच्या ताब्यात मिळावे या दोन मागण्या मोर्चाच्यावतीने करण्यात येणार आहे. 

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील बौद्ध पुन्हा एकदा एकजूट झाला आहे. बौद्धांच्या सर्व क्षेत्रातील संघटनांचा दि बुद्धीस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग हा महासंघ स्थापन करण्यात आला असून या महासंघाच्यावतीने हा मोर्चा होणार आहे. मोर्चानंतरही फेडरेशनचे काम सुरुच राहणार असून जिल्ह्यातील बौद्ध बांधवांची एकजूट राखत त्यांच्या प्रश्नावर विधायकपणे काम करण्यात येणार आहे. सोमवारी होणा-या मोर्चाला जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी हजारोंच्या संख्येने शांततेत उपस्थित राहण्याचे आवाहन मोर्चाचे निमंत्रक समितीचे सदस्य आनंद कासार्डेकर,विद्याधर कदम, शामसुंदर जाधव, समाजभुषण संदीप कदम, अंकुश कदम, मधुकर जाधव, रवींद्र पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.