
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी कंबर कसली असून गेली अनेक वर्षापासून जिल्हा परिषद संकुल परिसरातील साचलेले कचऱ्याचे ढीग आज सकाळपासून स्वच्छता मोहीम राबवून उपसले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रवींद्र खेबुडकर यांनी जिल्हा परिषद कार्यालयीन स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषद परिसराची पाहणी करून अनेक वर्षापासून साचलेले कचऱ्याचे ढीग तसेच जिल्हा परिषद परिसरातील गंजलेले फलक, लोखंडी खांब याबाबत नाराजी व्यक्त करत परिसर स्वच्छतेचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार आज सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अनेक दिवसांपासून साचलेले कचऱ्याचे ढीग उपसले. कचरा गाडीत भरून ते दूर केले. या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेत शासकीय कामात गती येण्या बरोबरच स्वच्छतेचा आदर्श कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केला आहे. तसेच काम चुकार व उशिरा कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासक म्हणून वचक निर्माण केला आहे.