पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी किती रोजगार दिले ? : अर्चना घारे परब

Edited by:
Published on: November 13, 2024 19:52 PM
views 61  views

सावंतवाडी : विधानसभा मतदारसंघात फिरताना असंख्य बेरोजगार युवक - युवतीनी आपल्या समस्या मांडल्या. हाताना काम नाही त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण वाम मार्गाकडे वळत आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी वेंगुर्ला या तालुक्यातील अनेकांनी नोकरी नाही, कामधंदा नाही म्हणून आपले जीवन संपवले. गोवा राज्यातील लगतच्या काही गावातील तरुण- तरुणी अगदी दहा बारा हजारांसाठी गोव्यात जातात. एवढ्या तुटपुंज्या पगारात त्या ठिकाणी खोली घेऊन रहाणे शक्य नसते. काहीजणांचे  प्रवास करताना दुर्दैवी अपघातात निधन झाले. अशी विदारक परिस्थिती असताना आणि सत्ता असताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत ? असा सवाल अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी केला.

निवडणूका जवळ आल्या की नेहमीप्रमाणे लोकांना पोकळ आश्वासन द्यायची. खोट्या घोषणा करायच्या आणि निवडून यायचं हा फंडा गेली पंधरा वर्षे चालला. नव्वदच्या दशकानंतर भारताने डंकेल प्रस्ताव स्वीकारला. देशाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी नोकऱ्या हा विषय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. खाजगीकरणामुळे कंञाटी कामगार व्यवस्था निर्माण झाली. कंञाटी कामगार ही एक प्रकारची वेठबिगारीच असून यामध्ये संबंधित कंञाटदार हा त्या कामगारांचे आर्थिक शोषण करत असतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

 चष्म्याच्या कारखान्याची घोषणा केलेली होती की ज्यातून एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार होता. अंत्तराचा कारखाना, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार, एज्युकेशनल हब , प्रक्रिया उद्योग अशा एक नव्हे अनेक घोषणा केल्या पण प्रत्यक्षात जमीनीवर काहीच नाही. सातत्याने गेली पंधरा वर्षे वेगवेगळ्या पक्षात जावून फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी जनतेच्या तोंडाला पान फुसण्याच  काम अविरतपणे सुरू आहे. जर खरोखरच काम केल असत तर निरनिराळ्या माध्यमातून प्रलोभन देण्याची वेळ आली नसती. यावेळी या मतदारसंघातील सुज्ञ जनता अशा प्रलोभनांना व आभासी विकासाच्या पोकळ घोषणाना मुळीच बळी पडणार नाही. सत्तेसाठी आपलं इमान गहाण ठेवणाऱ्याना व मतदारांना कायम स्वरूपी गृहीत धरून पक्ष बदलणाऱ्याना या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता निश्चितपणे अद्दल घडवणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.