
कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रहिवासी प्रमोद बांबर्डेकर यांच्या राहत्या घरास सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला आग लागली. या आगीत सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीत घरातील कपडे, भांडी, टीव्ही, सोफा, टेबल, फर्निचर, कौले, वायरिंग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. या घराला लागलेली आग एवढी भीषण होती की, घराच्या छपरावरील कौलांना तडे गेले. यामध्ये जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली.
सदर घटनास्थळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर पोलीस हवालदार दर्शन सावंत आणि हवालदार गणेश चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पो. हे. कॉ. कृष्णा परुळेकर करीत आहेत.