
सावंतवाडी : विहिरीत पडून बुडणाऱ्या मुलाला जीवदान देणाऱ्या मालवण येथील जयदीप खोडके याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. मालवण रेवतळे येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या ग्रुपमधील एक १४ वर्षीय मुलगा चेंडू पकडण्याच्या नादात विहिरीत पडला. तिथेच क्रिकेट खेळणारा इयत्ता नववीचा विद्यार्थी जयदीप प्रकाश खोडके याच्या निदर्शनास येताच, त्याने कुठलाही विचार न करता विहिरीमध्ये उडी घेऊन त्या मुलाला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही बातमी संपूर्ण जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. सध्या जयदीपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा न्यू इंग्लिश हायस्कूल कसाल येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यकारणी सभेमध्ये जयदीप खोडके याचा त्याच्या आई-वडिलांसह संघटनेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकीकरणबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून जानेवारी २०२३ मध्ये सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असेही ठरविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे, उपाध्यक्ष धनश्री गावडे, उपाध्यक्ष सुहास देसाई, आपा ठाकूर, बी. बी. चव्हाण, पांडुरंग दळवी, शाबी तुळसकर, विजय गवस, लाडू जाधव, निलेश पारकर, शरद कांबळे, रुपेश खोबरेकर, गोपाळ हरमलकर, शर्मिला गावकर, गजानन मांजरेकर, विलास नाईक, गोविंद कानसे, दिलीप देवगडकर, सुधाकर बांदेकर, एस. के. सावंत, बाबी लोंढे, विनायक पाटकर, राजेंद्र शेटकर आदी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.