भूगोलाच्या ज्ञानातूनच इतिहास घडवता येतो : गणेशप्रसाद गवस

हळबे महाविद्यालयात तालुक्यातील भूगोल शिक्षकांची कार्यशाळा
Edited by: लवू परब
Published on: April 08, 2026 16:09 PM
views 60  views

दोडामार्ग : आपणाला नवा इतिहास घडवायचा असेल, तर त्या प्रदेशातील भूगोलाचे सखोल ज्ञान असणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केले. ते येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

दोडामार्ग तालुक्यातील भूगोल विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी “भूगोल विषयातील तंत्र कसे शिकवावे” या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालय व तालुका शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यशाळेस तालुक्यातील ४७ शाळांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक, शिक्षण विभागाचे दिगंबर काळे तसेच भूगोल विभागप्रमुख डॉ. पी. डी. गाथाडे उपस्थित होते.

आपल्या भाषणात गवस पुढे म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झाला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. भूगोल विषयात आज अनेक नवीन करिअर संधी उपलब्ध होत असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शाळेत आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सूर्यकांत नाईक यांनी, विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन आवश्यक असल्याचे नमूद केले. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनातून शिक्षकांच्या ज्ञानात भर पडते, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी, अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे शिक्षक अद्ययावत राहतात व त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होऊन शिक्षण अधिक आनंददायी बनते, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. पी. डी. गाथाडे यांनी केले, तर आभार डॉ. दिलीप बर्वे यांनी मानले.

या कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांना विविध खेळ व शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून भूगोल विषय रंजक पद्धतीने कसा शिकवावा याचे प्रात्यक्षिक डॉ. हेमंत पेडणेकर यांनी सादर केले. डॉ. पेडणेकर हे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या भूगोल अभ्यासक्रम निर्मिती मंडळाचे सदस्य असून त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत १९० हून अधिक शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.