
सावंतवाडी : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीत उद्या हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्या सकाळी ११. वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मिलाग्रीस हायस्कूल ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली या निमित्ताने काढण्यात येणार असून मोठं शक्ती प्रदर्शन दीपक केसरकर करणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी अखेरच्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.