
सावंतवाडी : आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन मळेवाड येथील तीन एकर जागा खासगी वा शासकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी विनामोबदला देण्याचा प्रस्ताव उपसरपंच तथा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हेमंत मराठे यांनी ठेवला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित पत्रकारांना त्यांनी याबाबत आवाहन केले आहे.
तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हेमंत मराठे व दिव्या वायंगणकर यांचा वाढदिवस सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री. मराठे यांनी आरोग्यच्या समस्या लक्षात घेऊन मळेवाड येथील ३ एकर जागा खासगी वा शासकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी विनामोबदला देण्याचे जाहीर केले.
यासाठी त्यांच्या वडीलांचे नाव तसेच अटी शर्ती राहतील असा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीचा प्रस्ताव त्यांनी पत्रकारांसमोर ठेवला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, जिल्हा खजिनदार अँड. संतोष सावंत, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, दीपक गांवकर, रुपेश हिराप, विनायक गांवस, निखिल माळकर, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक आदी पत्रकार उपस्थित होते.