
सावंतवाडी : सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी प्रयोग करताना विशेष आनंद झाला. तुमच्या मनोरंजनातून सामाजिक हीत साधू शकलो याचा विशेष आनंद वाटतो असे प्रतिपादन अभिनेते भाऊ कदम यांनी केले. रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदुरच्या मदतीसाठी धमाल विनोदी व्यावसायिक नाटक 'सिरियल किलर' बॅ नाथ पै सभागृहात रसिकांच्या तुफान प्रतिसादात संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. भाऊ कदम यांच्या हस्ते संविताश्रमाचे संचालक संदीप परब यांचा सत्कार देखील याप्रसंगी करण्यात आला.
भाऊ कदम पुढे म्हणाले, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी नाटक करताना खुप छान वाटलं. तुमच्या मनोरंजनातून सामाजिक हीत साधू शकतो याचा विशेष आनंद होत आहे. कोकणी असल्याचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. सिंधुदुर्गच्या कलाकारांची निर्मिती असलेलं 'सिरीयल किलर' हे सर्वोत्तम व्यावसायिक नाटक असून त्याचे यशस्वी प्रयोग सिंधुदुर्गात होत आहेत. नाटकचा २५ वा प्रयोग आज बाबा वर्दम नाट्यगृह कुडाळ येथे पार पडणार आहे. शुक्रवारी सावंतवाडी बॅ नाथ पै सभागृहात रसिकांच्या तुफान प्रतिसाद हा नाट्यप्रयोग पार पडला. जीवन आनंद संस्था यांच्या आर्थिक मदतीसाठी हा नाट्य प्रयोग करण्यात आला. यावेळी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते संविताश्रमाचे संचालक संदीप परब यांचा त्यांच्या कार्यासाठी सत्कार करण्यात आला. यावेळी लेखक-दिग्दर्शक केदार देसाई, निर्माता प्रणय तेली, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, दिपाली जाधव, अभिनेता तेजस पिंगुळकरने, माजी सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी सभापती प्रमोद कामत यांनी आभार व्यक्त केले. संविताश्रम निराधार लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. नाटकाच्या माध्यमातून या समाजकार्याला मदतीचा हात दिला गेला आहे. भाऊ कदम व टीमचे यासाठी ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच असे श्री. कामत म्हणाले. तर भाऊ कदम यांसह या नाटकाचे कलाकार हे सिंधुदुर्गचे आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाला. तर माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या नाटकाचे पोश्टर प्रकाशित करण्यात आल. आमच्या रसिकांनी नेत्यांनी साथ दिली. तसेच संदीप परब यांची भावना काहीतरी देऊन संस्थेला मदत घेण्याची होती. रसिकांच मनोरंजन करून आम्ही ते साध्य करू शकलो. रसिकांनीही त्याला भरभरून सहकार्य केल्याचे मत निर्माते प्रणय तेली यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना संविताश्रमचे संदीप परब म्हणाले, संस्थेला मदत करणारी ही लोक आहेत. आज खास भाऊ कदम यांच्यासाठी ही मंडळी त्यांच्यावरील प्रेमापोटी आली होती. या नाटकातून सामाजिक संदेश देखील दिला आहे. आपली मूल आपलीच आहेत की फेसबुक,गुगलची ? या एका वाक्यात भाऊ कदम यांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडल आहे असं मत व्यक्त करत श्री. परब यांनी संस्थेला मदत करणाऱ्यांचे आभार मानले.