
मालवण : मालवणला सतत तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळत आहेत. समुद्रही खवळला असून अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. शहरात सखलं भागात पाणी साचले असून आडवणं येथेही गुडघाभर पाणी साचले असून नागरिक, वाहनचालक यांची तारांबळ उडत आहे. तर चिपी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंभारमाठ येथील अवघड वळणावर दरड कोसळली आहे.
मालवणात गेले तीन ते चार दिवस पावसाने झोडपून काढले आहे. नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तीन कोसळणाऱ्या पावसाने मालवणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेचाही लपंडाव सुरु असून वारंवार विजापुरवठा खंडित होत आहे. या पावसात कुंभारमाठ चिपी विमानतळाकडे जाणाऱ्या सागरी महामार्गावरील अवघड वळणावर दरड कोसळली आहे. या रस्त्यावर डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मे महिन्यात याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पहिल्याच पावसात दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याठिकाणी अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामाना वेग आला आहे. तरवा लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. एक महिना उशिरा पाऊस आल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र आता शेतीची सर्व कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. आंबा बागायतदार यांनीही आंबा कलमाना खते घालण्यास सुरुवात केली आहे. तर, समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खवय्यांनी आपला मोर्चा खाडी किनारी वळवला आहे. खाडीतील मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी होत असते.