LIVE UPDATES

मुसळधार पावसाने राजापुरात पडझड

विद्युत पुरवठा खंडित
Edited by: मनोज पवार
Published on: June 14, 2025 15:58 PM
views 106  views

राजापूर : तालुक्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असल्याने काही ठिकाणचे रस्ते धोकादायक बनले आहेत. तर विद्यूत वाहिन्यांवर झाडांच्या मोठ्या फांद्या पडून वीजेचे खांब देखील वाकले आहेत.

राजापूर चुनाकोळवण मधील सुतार वाडी या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी चिंचेची फांदी मोडून पडल्याने वीजेचे खांब कोसळले आहेत. तसेच काही विजेचे खांब वाकले आहेत. त्यामुळे २ महसूल गाव पूर्णपणे अंधारात आहेत. राजापूर तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही झाडाची फांदी पडून विजेचे खांब कोसळले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे चुनाकोळवण महसूल गावातील गुरव वाडी, तांबे वाडी, सोनार वाडी, बौद्ध वाडी, भट वाडी तसेच निरखोल गावाच्या हद्दीतील डोंगर वाडी, टेंब वाडी, कांबळे वाडी आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच सागवे  ठुकरुल वाडी येथील रस्ता खचला असून रहदारीला धोकादायक बनला आहे.

 सागवे जांभारी शाळे जवळील संरक्षक भिंत कोसळली असल्याने शाळेला धोका निर्माण झाला आहे. ताम्हाणे पहिलीवाडी येथे ताम्हाणे - मोरोशी रस्त्यावर चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे.