
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी बरसला. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तालुका वासीय मात्र सुखावले आहेत.
हवामान खात्याने गुरूवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. गुरूवारी सकाळपासूनच वातावरणातील उष्मा वाढला होता. गरमीने तालुकावासीय हैराण झाले होते. दुपारी ३ वा.च्या सुमारास ढग दाटून आले. त्यानंतर सायंकाळी ४:४० वा.च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरू झाला. जोरदार वाराही सुटला होता. जवळपास पाऊण तास मुसळाधार पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. दुचाकीचालक पावसापासून बचाव करण्यासाठी शक्य तेथे आसरा घेऊ लागले. पावसामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला.











