उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची चिपळूणात जोरदार तयारी

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2024 05:41 AM
views 39  views

चिपळूण  : जनसन्मान यात्रेच्या निमीत्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी २१ रोजी चिपळूणात येत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमीत्ताने शहरात बाईक रॅली काढण्यात येणार असून ठिकठिकाणी अजित पवारांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. तसेच इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील पटांगणात होणाऱ्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार महिलांशी संवाद साधणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हेलिकॉप्टरने शनिवारी दुपारी ३ वाजता सावर्डेत दाखल होणार आहेत. त्यावेळी सावर्डे बसस्थानक तसेच चिपळूणातील पाग येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बहादूरशेखनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर तेथून सांस्कृतीक केंद्रापर्यंत बाईक रॅली निघेले. या रॅलीत राष्ट्रवादीच्या तरूणांची फळी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर श्री भैरी देवस्थान मंदिरास भेट देणार आहेत. त्यानंतर ४.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील पटांगणात होणाऱ्या जनसन्मान यात्रेत लाडक्या बहिणींशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचे शहराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या कार्यालयास उपमुख्यमंत्री पवार भेट देणार आहेत.

स्व. नाना जोशी यांच्या दै. सागर निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर शहरातील मुस्लीम समाज व्हॉलमध्ये समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ७ वाजता महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. जनसन्मान यात्रेची राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी सांस्कृतीक केंद्रासमोर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघात आमदार शेखर निकम यांनी मागणी केलेल्या बहुतांशी विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला. शहरासाठी महत्वाची असलेली ग्रॅव्हिटी पाणी योजनाही मार्गी लागत आहे. दिर्घकाळानंतर पवार चिपळूणात येत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चैतन्यांचे वातावरण आहे. अजित पवारांच्या सभेसाठी शहरासह गावा-गावातील महिलांनाही मोठ्या संख्येने निमंत्रीत करण्यात आले आहे. शहरासह तालुक्यातील फलकाच्या माध्यमातून जनसन्मान यात्रेचा माहोल तयार केला आहे. सोमवारी खासदार शरद पवार यांची चिपळूणात जाहीर सभा होत असल्याने उपमुख्यमंत्री पवार सभेत काय बोलणार याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.