
वैभववाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सखाराम धर्मा वाझे, वय ५२ या कर्मचाऱ्याचा मृतदेह तो राहत असलेल्या शासकीय खोलीत कुजलेल्या स्थितीत काल (ता.१४)रात्री सापडला. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. या कर्मचाऱ्याचा मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
येथील ग्रामीण रुग्णालयात सखाराम वाझे हे लिपिक पदावर कार्यरत होते. रुग्यालयाशेजारीच शासकीय खोलीत ते राहत होते. शुक्रवारी ते आपली ड्युटी संपवून आपल्या खोलीवर गेले. मात्र त्यानंतर ते दोन दिवस कोणालाही दिसून आले नाही. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणारे सहकारी सोमवारी रात्री सुट्टीवरून परतले. तेव्हा त्यांना बाजूला वाझे राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. या खोलीला आतून कडी होती. त्या कर्मचा-याने वाझे यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला, मात्र पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब त्या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांना सांगितली. त्यांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांच्या उपस्थितीत त्याखोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी समोर वाझे यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. या प्रकाराबाबतची माहिती पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली. आज सकाळी त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर शवविच्छेदन करुन सायंकाळी मृतदेह ताब्यात देण्यात आला.
श्री.वाझे हे मुळ पुणे सिन्नर येथील राहणारे होते. ते गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पदोन्नती देखील झाली होती. मात्र व्यसनामुळे त्यांची कारकीर्द अनेकदा वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.