गोव्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील 'तो' निर्णय लागू करा !

...तरच आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग सक्षम होईल : देव्या सुर्याजी
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 14:50 PM
views 231  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेच्या अभावाबाबत आम्ही गेली अनेक वर्षे आवाज उठवत आहोत.लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, आरोग्य यंत्रणा आजही व्हेंटिलेटरवर आहे. कोकणसादनं या समस्यांना वाचा फोडून आम्हाला बळ दिलं आहे. रिक्तपदांचा प्रश्न आजही कायम आहे. ही पद प्राधान्याने भरणं आवश्यक आहे. तरच आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग सक्षम होईल. त्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांना डिग्री प्राप्त केल्यानंतर किमान एक वर्ष शासकीय रूग्णालयात सेवा देण बंधनकारक करण आवश्यक आहे. याबाबतची मागणी युवा रक्तदाता संघटनेकडून महाराष्ट्र सरकारकडे करण्यात येणार आहे अशी माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली.


गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याकडे आम्ही आरोग्याच्या समस्यांबाबत पाठपुरावा करत आहोत‌. चांगली आरोग्य सेवा मिळण्याबाबत त्यांच लक्ष वेधत आहोत. परंतु, त्या समस्या काही सुटत नाही आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रूग्णालयातील सर्व रिक्तपद तातडीनं भरली गेली पाहिजेत. ज्यावेळी किमान ७५ टक्के पद भरली जातील त्याचवेळी आरोग्यप्रश्नी सिंधुदुर्गवासियांना दिलासा मिळू शकेल. त्याकरिता महाराष्ट्रतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाची डिग्री घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना गोवा राज्याप्रमाणे किमान एक वर्ष शासकीय रूग्णालयात सेवा देण बंधनकारक करण आवश्यक आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एक वर्ष शासकीय रुग्णालयात सेवा देण्यासाठीचा करार केला जातो तसाच निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपोआप रिक्तपदांचा प्रश्न निकाली लागेल. यातीलच काही डॉक्टर हे कायमस्वरूपी शासकीय सेवेत देखील रूजू होतील व रिक्तपदांचा गंभीर बनत चाललेला प्रश्न उरणार नाही. गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील हा निर्णय घ्यावा यासाठी आरोग्याच्याबाबतीत संवेदनशील असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांचं युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून लक्ष वेधणार आहे. या मागणीच निवेदन त्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती देव्या सुर्याजी यांनी दिली. 


दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत कायमस्वरूपी फिजीशीयनची नियुक्ती करण्यात यावी, डॉ. चितारी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुर्णवेळ फिजीशीयन येथे उपलब्ध नाही. डॉ. अंबापुरकर, डॉ. निर्मला सावंत हे ऑन कॉल येत आहेत. ते देखील  चांगली सेवा देखील देत आहेत. परंतु, त्याचबरोबर कायमस्वरूपी फिजीशीयन रूग्णालयात असणं आवश्यक आहे. फिजीशीयन हा रूग्णालयाच 'हृदय' आहे‌. त्यामुळे कायमस्वरूपी फिजीशीयन रूग्णालयाला द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.