
देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट्स एड् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ मे २०२५ रोजी श्री कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास येथे सकाळी १०.०० वा. ते दुपारी २.०० वा. पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, कान नाक घसा तपासणी, रक्तदाब (ब्लडप्रेशर), आणि फुफ्फुसे तपासणी, स्त्री-रोग/स्त्रीस्तन कर्करोग तपासणी, सर्जीकल तपासणी व अन्य अत्यावश्यक तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडुन मोफत करण्यात येणार आहेत. मुंबई येथील महालक्ष्मी येथे मुख्यालय असलेली सीपीएए कर्करोगावर अत्यंत मुलभुत आणि व्यापक काम करत असलेली संस्था म्हणुन प्रचलित असुन या शिबिराच्या माध्यमातुन केवळ कर्करोग नव्हे तर जनरल सर्जरी, कान नाक घसा, फिजिशियन, स्त्रीरोग अशा विविध शाखांचे डॉक्टर त्यामध्ये जनरल सर्जन डॉ. सतिश काणेकर, कान नाक घसा तज्ञ डॉ. संजय घिल्डयाल, फिजिशियन डॉ. विना बोरकर व स्त्रीरोग तज्ञ डॉ. रचना मेहरा सहभागी होणार आहेत.
तसेच रुग्ण समुपदेशक म्हणुन सीपीएए च्या कार्यकारी संचालिका श्रीमती. निता मोरे व सहसंचालिका श्रीमती. मिनल परब सहभागी असणार आहेत. रुग्णांच्या तज्ञांकडुन तपासणी सोबत शिबिरात प्राथमिक रक्त तपास तसेच गर्भपिशवीच्या पॅप स्मीयर तपासणी केली जाणार असुन पुढील कुठल्याही स्वरुपाची आवश्यक रेडीयोलॉजिकल तपासणी मुंबईत विनामुल्य तत्वावर केली जाणार आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. अमेय देसाई- मुंबई आणि डॉ. विद्याधर तायशेट्ये - कणकवली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी ह्या आरोग्य महायज्ञाचा लाभ गरजवंतांनी घ्यावा असे आवाहन कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यावेळी अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे. यावेळी सचिव हेमंत वातकर,खजिनदार उदय पेडणेकर, संजय वाळके,रामदास तेजम आदी उपस्थित होते