आठवडा बाजारावरून स्थानिक विरुद्ध फिरते व्यापारी 'आमने-सामने'

फिरत्या विक्रेत्यांचा न.प.वर मोर्चा ; १०१ सह्यांच पत्र
Edited by: विनायक गांवस
Published on: March 03, 2023 13:26 PM
views 319  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आठवडा बाजार हलविणार असल्याच जाहीर केल्यानंतर भाजप व शिवसेनेचे मंत्री केसरकर यांच्यातील मतभेद समोर आले. आठवडा बाजारावरून दोन गट पडलेले असतानाच काही दिवसांपूर्वी स्थानिक व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी न.प.ला धडक देत मोती तलाव काठावर भरविला जाणार बाजार अन्यत्र हलवावा अशी मागणी केली. यातच शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून फिरत्या विक्रेत्यांनी संघटीत होत नगरपरिषदेवर मोर्चा काढला. मुख्याधिकारी सुट्टीवर असल्यानं त्यांची भेट झाली नाही. मात्र, सोमवारी भेट देणार असल्याच आश्वासन त्यांनी दिल्याच फेडरेशनच्या माध्यमातून सांगण्यात आलं. हा आठवडा बाजार आहे तिथेच असावा अशी या फिरत्या विक्रेत्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, या मोर्चामुळे स्थानिक विरुद्ध फिरते व्यापारी 'आमने-सामने'आले आहेत. तर जागा निश्चित करताना फिरत्या विक्रेत्यांचा व्यापार होईल अशीच जागा निश्चित करावी, आमदारकीला आम्ही देखील तुम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे फिरत्या विक्रेत्यांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावेत. व्यापाऱ्यांत भांडण लावून आपली राजकीय पोळी कुणी भाजू नये असा इशारा हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी देत फिरत्या विक्रेत्यांच्या १०१ सह्यांच पत्र न.प.च्या अधिकारी आसावरी शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल. 


 सावंतवाडी शहरात मंगळवारच्या आठवडा बाजार व अन्य दिवशी सावंतवाडी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सावंतवाडी नगरपालिकेने वेळोवेळी केलेले नियम व निर्देशांचे पालन करीत व्यवसाय करीत असतो. अलिकडेच वृत्तपत्रात आठवडा बाजाराची श्रीराम वाचन मंदीर ते शिवरामराजे भोसले पुतळा या दरम्याने भरणारा आठवडा बाजार होळीचा खुंट, जुना बाजार येथे हलविला जाईल अशा स्वरूपाचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे.त्याबाबत आमची हरकत नोंदवित आहोत. सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील आठवडा बाजाराची जागा आम्हा फेरीवाल्यांना विश्वासात न घेता नगरपालिकेने वेळोवेळी बदललेली आहे. आठवडा बाजाराची जागा बदलताना याबाबत आम्हा फेरीवाल्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. तसेच आठवडा बाजाराची जागा निश्चित करताना आठवडा बाजारासाठी येणाऱ्या ग्राहकांची सोय, त्यांना रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था त्याठिकाणी आहे अथवा कसे याचा विचार करून जागा निश्चित करण्यात यावी. आठवडा बाजाराची जागा निश्चित करताना त्याबाजारास येण्याचा व्यापाऱ्यांचा व्यवसाय होईल अशा स्वरूपाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. सध्यस्थितीत श्रीराम वाचन मंदीर ते शिवरामराजे भोसले यादरम्याने

असलेल्या बाजाराची जागा फेरीवाले ग्राहक यांना सोयीची असल्याने ही जागा बदलण्यात येवू नये. वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे होळीचा खुंट येथील आठवडा बाजाराची जागा ही गैरसोयीची आहे. त्याठिकाणी सर्व व्यापान्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी आठवडा बाजार हलविण्यात येवू नये.नगरपालिका हद्दीत हॉकर्स झोन जाहीर करताना जी समिती निश्चित करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये आम्हा फेरीवाल्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. तरी यापुढे फेरीवाल्यांच्याबाबत कोणतेही धोरण निश्चित करण्यापूर्वी आम्हा फेरीवाल्यांना विश्वासात घेण्यात यावे. आम्हा फेरीवाल्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. तर अलिकडेच व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी आठवडा बाजार भरवावा अशी मागणी केलेली आहे. या मागणीस आमची सक्त हरकत आहे. फेरीवाले व्यापारी आठवडयाचे सातही दिवस वेगवेगळया गावात जावून आपला व्यावसाय करतात. आठवडयातून एकच दिवस आठवडा बाजार झाल्यास त्यांचेवर उपासमारीची वेळ येणारी आहे. फेरीवाले हे बहुतांशी सावंतवाडी नगरपालिका हद्दीत वास्तव्य करतो. आम्ही सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील मतदार आहोत. तरी सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील रहिवासी व मतदार या नात्याने आपण आमच्या हिताचे रक्षण करावे व आमचेवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असं १०१ सह्यांच निवेदन महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना देण्यात आल आहे. सावंतवाडी नगरपरिषदेवर ''हम सब एक है'' चा नारा देत मोर्चा काढत हे निवेदन देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशन जिल्हाध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, नाजिम पटेल, राजेंद्र लेंडगे, संदीप गौंड, इरसाद मालदार, सुमन वाडीकर, सुभाष चव्हाण आदी फिरते व्यापारी उपस्थित होते