हळबे महाविद्यालयात ए. डी. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात...!

Edited by: संदीप देसाई
Published on: September 16, 2023 13:57 PM
views 77  views

दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात ए. डी. श्रॉफ  वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये प्रथम  क्रमांक महिमा गवस हिने पटकवला. साक्षी व सोनल गवस यांना विभागून द्वितीय, तर रामा गवस यांनी तृतीय क्रमांक पटकावला. फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजेस मुंबई आणि लक्ष्मीबाई सिताराम हळवे महाविद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देश-विदेशातील आर्थिक घडामोडीची जाणीव व्हावी या हेतूने गेल्या 57 वर्षापासून ही स्पर्धा घेण्यात येते. तर हळबे महाविद्यालयात मागील अकरा वर्षापासून ही स्पर्धा राबविण्यात येते.

यावर्षीच्या स्पर्धेसाठी भारतातील रुपया जागतिक राखीव चलन म्हणून उदयास येण्यास तयार आहे का.हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेने कोणती पावलं उचलली पाहिजेत ?.2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार का? कौशल्य विकासाचा अभाव हे बेरोजगारीचे भयानक वास्तव आहे यासाठी कोणती पावलं उचलण्यात आली आहेत? हे विषय होते. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 2500 रुपये, द्वितीय 1500,तर तृतीय 1000 रुपये, व प्रमाणपत्र असे याचे स्वरूप होते.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दोडामारे इंग्लिश स्कूल दोडामार्ग येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक केदार म्हस्कर व हळबे महाविद्यालयातील प्रा.डॉ पि.डी. गाथाडे यांनी काम पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत म्हणाले की, आज विद्यार्थी वाचन करीत नाहीत. चालू घडामोडीची माहिती ठेवत नाहीत.आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्याचा वापर चांगल्यासाठी केला तर जीवन सुखी आणि समृद्ध  बनेल. आज प्रत्येक विद्यार्थ्याला देश विदेशातील आर्थिक घडामोडीची माहिती असायला हवी. तरच आपण आपला, आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा विकास आपण करू शकतो.

सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय खडपकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. पुष्पलता गावडे हिने मानले.