कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 15, 2023 20:25 PM
views 216  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली.कणकवली,सावंतवाडी,कुडाळ,वैभववाडी यासह अन्य अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कणकवलीत काही भागात पावसासोबत गाराही पडल्या.विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 

आज सायंकाळी ४ वाजल्यानंतर मुसळधार पाऊस  झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं भात पीकाचे नुकसान झाले आहे. काही भागात उभे असलेले भात पीक आडवे होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

तसेच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पाऊस झाल्याने पुढील नऊ दिवस पाऊस लागण्याची शक्यता आहे . हळवी भात शेती कापणी योग्य झाली असून, अनेक ठिकाणी भात पिकाची कापणी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र या कापणीच्या तोंडावर सायंकाळच्या सत्रात गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज अधिकच जोर केल्याने शेतकऱ्यांची नुकसान वाढत आहे.

घटस्थापना असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र,अचानक जोरदार पाऊस पडल्याने उत्सवात विस्कळीतपणा निर्माण होण्याची शक्यता आहे.