'हा' चाकोरी बाहेरच्या कामाचा गौरव | शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी शिक्षिका सुषमा मांजरेकर यांचं केलं कौतुक

शिक्षण प्रसारक मंडळ आरोसतर्फे प्रशालेत सत्कार
Edited by: भगवान शेलटे
Published on: September 13, 2023 14:49 PM
views 152  views

सावंतवाडी : बदलत्या परिस्थितीत समाज व राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. नव्या पिढ्या घडवताना त्यांच्यात देशाप्रती आदर व सन्मानाची भावना पेरण्याचे काम शिक्षक करीत असतात. म्हणूनच दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत शिक्षकांचा गौरव केला जातो. विद्या विहार हायस्कूलच्या शिक्षिका सुषमा मांजरेकर यांनी विद्यार्थिभिमुख, उपक्रमशील व चाकोरीबाहेर जाऊन अध्यपनाचे काम केले.

त्यामुळेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. असे गुणवंत शिक्षक शिक्षण विभागाची शान व अभिमान आहे. इतर शिक्षकांनीही त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. नवीन शैक्षणिक धोरण अमलबजावणीसाठी सज्ज रहावे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी, विद्यार्थि सक्षम होण्यासाठी यापुढेही सौ. मांजरेकर मॅडम यांनी उपक्रम राबवावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी आरोस येथे केले.

विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ आरोसतर्फे प्रशालेत सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी चौगुले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ आरोसचे अध्यक्ष नीलेश उर्फ बाळा परब हे होते.

यावेळी व्यासपिठावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक रामचन्द्र आंगणे, संस्थेचे सचिव शांताराम गावडे, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव पांगम, प्रसाद नाईक, सत्कार मूर्ती सुषमा मांजरेकर, प्रवीण मांजरेकर, संचालक बाबी परब, माजी संचालक तुळशीदास मालवणकर, दांडेली सरपंच नीलेश आरोलकर, आरोस सरपंच शंकर नाईक, उपसरपंच सरिता नाईक, दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक, जय हनुमान नाट्यमंडळ चे संदीप माणगावकर, कोंडुरा हायस्कूल मुख्याध्यापक सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षणाधिकारी चौगुले यांच्या हस्ते सौ मांजरेकर यांचा सपती सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री केसरकर यांचे स्वीय सहाय्यक आंगणे म्हणाले, सौ. मांजरेकर यांना मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार हा शाळेचा सन्मान आहेच त्याचबरोबर जिल्ह्याचाही सन्मान आहे. या पुरस्कार पर्यंत झेप घेणे ही साधी गोष्ट नाहीं. पुरस्कारासाठी दीड महिना प्रक्रिया सुरु असते. तटस्थपणें जिल्ह्यास्तरावरील दोन व राज्य स्तरावर तीन समित्या पुरस्कार प्रक्रियेत सहभागी असतात. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या सुविधा आहेत व त्यांचाही सन्मान ही राखला जातो. त्यामुळे मांजरेकर मॅडम यांनी मिळविलेला पुरस्कार सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

संस्थेचे सचिव गावडे यावेळी म्हणाले, शिक्षण मंत्री केसरकर यांचे या शाळेसाठी मोठे योगदान आहे व त्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत मिळालेला हा सन्मान शाळेच्या लौकिकात भर टाकणारा आहे, असे म्हणाले. यावेळी सत्कारमूर्ती मांजरेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेला दिले. संस्थेने दिलेल्या वेळोवेळीच्या प्रोत्साहनामुळेच आपल्याला काम करण्याचे बळ मिळाले. तसेच मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व कुटुंब यांचाही पुरस्कारात वाटा असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश देऊलकर तर आभार मोहन पालेकर यांनी मानले.