ज्ञानदीप तर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 15:45 PM
views 290  views

सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे कळसुलकर प्रशालेचे कला शिक्षक एस.व्ही. पेडणेकर आपल्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल व कळसुलकर प्राथमिक शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक डी.जी.वरक हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल ज्ञानदीप मंडळातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा कळसुलकर हायस्कूल मध्ये संपन्न झाला. सुरूवातीला मुख्याध्यापक एन.पी.मानकर व प्रदीप सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उत्सव मूर्तींच्या कार्याचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या. विजय पेडणेकर यांनी ज्ञानदीपने राबविण्यात आलेल्या उपक्रमांना महत्त्वाचे योगदान दिले आहे. रंगभरण, चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.तसेच डी.जी.वरक  यांनी प्राथमिक शाळेत सेवा बजावत ते पदव्युत्तर झाले, राज्य स्तरीय महत्त्वाची सेट‍ परीक्षेत यश संपादन करुन मोठं यश संपादन केले हे आदर्शवत आहे. सार्थ अभिमान ज्ञानदीप मंडळाला आहे असे‌ प्रशंसोदगार काढून शुभेच्छा दिल्या.

या वेळी व्यासपीठावर एस.आर.मांगले, शिक्षक परिषदेचे राज्य स्तरीय सदस्य शिवाजी सागडे, कोकण विभाग कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख उपस्थित होते. याप्रसंगी सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त करुन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वेणुनाथ कडू यांनी कोकणात गुणवत्ता आहे.शिक्षक हाच खरा शिल्पकार आहे अशा गुणवंत शिक्षकांच्या योगदानामुळे विद्यार्थी घडतात.ज्ञानदानाचे पवित्र कार्यातून भावी पिढी संस्कारक्षम होते अशा सन्मान कार्यक्रमामुळे प्रेरणा व प्रोत्साहन मिळते एक ऊर्जा मिळते असे मौलिक विचार मांडले.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रा रुपेश पाटील,एस.पी.कुळकर्णी, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष वैभव केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते‌. सूत्रसंचालन अनिल ठाकर यांनी आभार एस. व्ही. भुरे यांनी मानले‌.