आजगांवात 'गुरूवंदना २०२३' संगीत सोहळा संपन्न | श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवाराचे आयोजन

Edited by: दिपेश परब
Published on: August 10, 2023 11:05 AM
views 125  views

वेंगुर्ला : संगीत अलंकार गुरुवर्या वीणा दळवी संचलित 'श्री राधाकृष्ण संगीत साधना' शिष्यपरिवाराच्या वतीने "गुरूवंदना २०२३" हा संगीत सोहळा शनिवारी ५ ऑगस्ट रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगांव येथे दिमाखात संपन्न झाला. यावेळी गोवा येथील ज्येष्ठ संवादिनी वादक राया कोरगांवकर, सुप्रसिद्ध किर्तनकार डाॅ. श्रीराम दिक्षीत, सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक गुरूवर्य निलेश मेस्त्री प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील या ज्येष्ठ मंडळींनी यावेळी विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले.

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध गायिका मंजिरी धोपेश्वर, शिवसेना नेते एकनाथ नारोजी, ज्येष्ठ नाट्यकर्मी भाऊ साळगांवकर, अभिनेते श्री धुमे, सुनाद रेकाॅर्डिंग स्टुडिओचे संचालक अनंत नाईक, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते मृणाल गोसावी, सुप्रसिद्ध पखावज/ढोलकी वादक अनय सावंत, पत्रकार प्रसाद परब, दिनेश मयेकर, योगिता कानडे आदी मान्यवरांचीही या सोहळ्याला उपस्थिती लाभली. आसोली येथील युवा निवेदक शुभम धुरी यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी गायन-वादन सादर करून गुरुंप्रती संगीतमय गुरुवंदना वाहिली. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, संगीतप्रेमी रसिक आणि विद्यार्थ्यांचे पालकवर्ग यांनी यावेळी उपस्थित राहून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. सर्वच शिष्य परिवार, राधाकृष्ण संस्थेचे सचिव हेमंत दळवी आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांवचे श्री गजा पांढरे, अविनाश राय शिरोडकर, पखावजवादक दत्ताराम उर्फ अनय सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.