विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हीच गुरुदक्षिणा : प्रा. मिलिंद काळे

Edited by: मनोज पवार
Published on: July 23, 2024 12:46 PM
views 226  views

लोटे : आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतीय प्रथेप्रमाणे गुरुपौर्णिमा म्हणून मानला जातो. गुरुप्रती असलेला आदर आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा आदर करण्याचा हा दिवस. एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये देखील हा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती रुजावी वाढावी हा याचा मुख्य उद्देश होता. या  दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे औक्षण केले. 

विद्यार्थ्यानी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरचित कविता सादर केल्या. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ स्नेहल साळवी, मेट्रन, परशुराम रुग्णालय यांनी या कार्यक्रमात बोलताना गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.अध्यक्षीय  समारोपात प्राचार्य मिलिंद काळे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देत गुरुपौर्णिमेसारखे दिवस हे भारतीय परंपरेप्रमाणेच साजरे केले जावेत तरच पुढच्या पिढीपर्यंत हा संदेश आपण देऊ शकू आणि तुम्हाला मिळालेले घवघवीत यश हीच आमची गुरुदक्षिणा असेल असा मोलाचा संदेश दिला. 

याच दिवशी आयोजित केलेल्या दुसऱ्या कार्यक्रमात स्टुडन्ट कौन्सिल, रोट्रॅक्ट क्लब व एनएसएस युनिट एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्यातर्फे परशुराम रुग्णालयात रुग्णांसाठी फळ वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता कारण विद्यार्थ्यांना रुग्णालयात शिक्षण घेताना त्यांचे खरे गुरु रुग्ण असतात. हा संपूर्ण कार्यक्रम एमइएस आय एच एस चे डायरेक्टर डॉ.श्याम भाकरे, प्राचार्य मिलिंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.