मुळदे महाविद्यालयात MOOC कोर्सेसबाबत मार्गदर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2025 18:12 PM
views 72  views

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे मा. अधिष्ठाता व शिक्षण संचालक डॉ. एस. एस. नारखेडे यांनी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे भेट देत राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) अंतर्गत ICAR सहाव्या अधिष्ठाता समिती अभ्यासक्रमानुसार राबविण्यात येणाऱ्या MOOC (Massive Open Online Courses) विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी MOOC कोर्सेसची रचना, महत्त्व आणि विशेषतः शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या मूल्यांकन प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व तृतीय सत्राचे विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच नजिकच्या खाजगी कृषी महाविद्यालयांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी डॉ. नारखेडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यापीठातर्फे नेमणूक झालेले MOOC समन्वयक व सहाय्यक प्राध्यापक प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी प्रभावीपणे पार पाडले. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करत आणि NEP-2020 च्या प्रभावी अंमलबजावणीस चालना देणारा हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.