मळगाव स्कूलमध्ये सायबर क्राईमबाबत सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षकांचं मार्गदर्शन !

पोलिस जनता संवाद, सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: October 12, 2023 17:29 PM
views 107  views

सावंतवाडी : सायबर क्राईम हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे. सायबर क्राईम हा असा गुन्हा आहे ज्यामध्ये संगणक आणि नेटवर्कचा समावेश असतो. जसे की ईमेल स्पॅम, फिशिंग, पायरेसी, डेटा चोरी, हॅकिंग अशा पद्धतीने हे गुन्हे घडतात. याद्वारे अनेकांची आर्थिक फसवणूक देखील केली जाते. विशेषतः विद्यार्थी, महिला व व्यापारी याला बळी पडतात. त्यामुळे या प्रकारांपासून सावध राहा असे आवाहन सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी केले.      

सिंधुदुर्ग पोलीस दल पोलिस जनता संवाद, सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत मळगाव इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी सायबर सुरक्षा अंतर्गत - सोशल मीडिया पासवर्ड तसेच विविध विषयावर माहिती दिली.

तसेच विद्यार्थ्यांना व्यायाम, अभ्यास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्वतःची  जबाबदारी स्वच्छता, कर्तव्य, देशाभिमान,एकात्मता, ध्येयाचे महत्व पटवून दिले. यावेळी महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, पोलीस हवलदार श्री. सावळ, महिला समुपदेशक श्रीमती नमिता परब, मळगाव इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.  फाले व अन्य शिक्षक उपस्थित राहिले. सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे सूचनेप्रमाणे व पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी विद्यार्थ्यांना  सेक्युरिटी डेटा प्रायव्हसी,  डेटा शेअरिंग, आयडेंटिटी हॅकिंग, अकाउंट क्लोनिंग यासंदर्भात सुरक्षा व वाढते धोके यावर उपाययोजनांबाबत विस्तृत माहिती दिली. आर्टिफिशियल इंटेलिजंट ॲप बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत.गुगल पे, पेटीएम, ऑनलाईन वॉलेट त्याच प्रमाणे अर्बन बँक, तनिष्क ज्वेलर्स तसेच विविध शासकीय संस्था बँका यांच्या नावाने होणारे फ्रॉड व  त्याचे प्रकार यावर सुरक्षा बाबत उपाय व स्वतःची जबाबदारी त्यांनी मुलांना समजावून सांगितली.त्याच प्रमाणे ई-मेल व मेसेजिंग ॲप -ओटीपी फिशिंग लिंक क्लोनिंग ॲप यामधून फसवणूक याबाबत सुरक्षा, डार्क नेट-ह्यूमन ट्राफिकिंग मनी लाँडरींग  दहशतवादी कारवाया  सतर्कता आपले कर्तव्य व सुरक्षा याचीही माहिती दिली. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचेही धडे दिले. तंबाखू,गांजा,ड्रग्स, अमल्ली पदार्थ, तस्करी गुन्हेगारी, शरीरावर आणि मनोव्यापारावर परिणाम, देशविघातक कृत्ये,दहशतवाद फांडींग. वाढत्या हृदयविकार आणि स्ट्रोक समस्या तसेच एडिक्शनपासून बचाव, धोके व उपाय व खबरदारी तसेच यापासून वाढत्या वयात विचार नियंत्रण याबाबतही विस्तृत माहिती दिली. महिला समुपदेशक श्रीमती नमिता परब यांनी महिला सुरक्षा विषयक कायदे तसेच गुन्हेगारीच्या प्रकाराबाबत सखोल माहिती दिली. पॉक्सो व महिलांकरिता कायदेशीर सुरक्षा बाबी, आपले कर्तव्य, मुलींची छेडखानी परिणाम, हार्मोन चेंज दरम्यान वाईट विचारावर कंट्रोल यासंदर्भात त्यांनी माहिती विशद केली. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.