
कणकवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये युती करायची असे आमचे जवळपास ठरले आहे. युती व्हावी ही माझी इच्छा आहे. युती होणार की नाही याबाबत पालकमंत्री नितेश राणे एकट्यानेच निर्णय घेऊ शकत नाहीत. रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली मते मांडत असून मी खासदार म्हणून माझे मत मांडत आहे. नीतेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी यांनी युती करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मतेही लक्षात घ्यायला हवीत, असे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप पदाधिकारी महेश सारंग, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये युती व्हावी, असे मला वाटते. त्यामुळे नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची काय इच्छा आहे, हे देखील जाणून घ्यावे. आजच मी युतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. युती व्हावी असे सर्वांनाच वाटत आहे.
वास्तविक लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका आम्ही एकत्र लढलो होतो. मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळीच स्वतंत्र लढावे, असे यांना का वाटते आहे असा सवालही नारायण राणे यांनी केला.










