
सावंतवाडी : बांदा - सटमटवाडी येथील रहिवाशांच्या स्थानिक समस्यांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने दखल घेतली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनानुसार, जलजीवन पाईपलाईन आणि खराब झालेल्या सर्व्हिस रस्त्यांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी पुकारलेल उपोषण पालकमंत्र्यांच्या आश्वासनाअंती स्थगित केले होते. त्यानंतर श्री. राणेंनी तात्काळ या समस्यांची दखल घेतली.
बांदा येथील सटमटवाडी भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त होते. विशेषतः, जलजीवन मिशन अंतर्गत टाकलेल्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे पाण्याची नासाडी होत होती आणि पाणी रस्त्यावर साचत होते. यामुळे रस्ते धोकादायक बनले होते. चिखलामुळे शाळेतील विद्यार्थी आणि इतर ग्रामस्थांना ये-जा करताना मोठ्या अडचणी येत होत्या. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गावातील 'संघर्ष समिती' आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले होते. समाधान न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही दिला होता.
या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार, गुरुवारी दुपारी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी, ग्रामस्थांनी गणेश चतुर्थीच्या तोंडावर खराब रस्त्यांमुळे गणपतीच्या मूर्ती आणताना होणाऱ्या गैरसोयीकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर, राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जलजीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक तसेच भाजप पदाधिकारी, सटमटवाडीतील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.