
कणकवली : येत्या २१ डिसेंबरला भारतीय जनता पक्षाला चारही नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राणे म्हणाले, जिल्ह्यातील चारही नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विक्रमी मतदानाची नोंद केली आहे. शांत, सुव्यवस्थित वातावरणात पार पडलेल्या या मतदानाबद्दल जिल्हावासीयांचा मी गौरव करतो. मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने उत्तम समन्वय साधत मतदारांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण उपलब्ध करून दिले. ही लोकशाहीला बळ देणारी घटना असून सिंधुदुर्गवासीयांनी पुन्हा एकदा लोकशाहीची परंपरा जपली आहे.
चारही नगरपरिषदांमध्ये मिळून पक्षाने ८१ नगरसेवक उमेदवार आणि चार नगराध्यक्ष पदांचे उमेदवार उभे केले होते. संघटना म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे करणे आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढताना कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली, असेही राणे म्हणाले.
महायुतीतील वातावरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारणाची एक संस्कृती आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडतो, परंतु वैयक्तिक पातळीवर कोणतेही मतभेद किंवा वाद निर्माण होत नाहीत. युती झाली नाही म्हणून आरोप - प्रत्यारोप वाढतात, मात्र निवडणूक संपताच सर्वांनी विकासाच्या दिशेने पावले टाकणे गरजेचे आहे.
जिल्ह्याची प्रतिमा पर्यटन, रोजगार आणि गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीतून उद्भवलेल्या कोणत्याही घटना जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का देणार्या नसाव्यात. निवडणुकीचा कालावधी संपला आहे. आता सर्वांनी मिळून पुन्हा एकदा पर्यटनवाढ आणि जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही राणे म्हणाले.










