आरोंदा प्रशालेत सावित्रीबाईंना अभिवादन ; उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांची विशेष उपस्थिती !

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 13, 2023 13:33 PM
views 120  views

सावंतवाडी : आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आरोंदा हायस्कूल आरोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

 योगायोगाने या दिवशी प्रशालेची शालेय वार्षिक तपासणी होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण विभाग सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे या समारंभाला उपस्थित होते. विचारमंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ तांबे, मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी साळस्कर, विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगावच्या सहाय्यक शिक्षिका काव्या साळवी तर बीआरसी सावंतवाडीच्या सातार्डेकर मॅडम आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.

प्रथम उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्याहस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर व विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमात बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी ' सावित्रीबाई नसत्या तर आज आपण बहुजन समाजातील नव्या पिढीला शिक्षणाची द्वारे खुली करू शकलो नसतो. सावित्रीबाई ह्या ज्ञानज्योती म्हणून  सदैव अजरामर राहतील, असे प्रतिपादन केले.

उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी सांगितले की, सावित्रीबाईंच्या जन्माने समग्र स्त्री जातीचाच नव्हे तर भारतीय समाजाच्या जीवनामध्ये उजेडाचे नवे दालन खुले झाले. आपण नेहमीच सावित्रीबाईंचे विचार  जोपासले पाहिजेत, त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे. असे मौलिक विचार मांडले. 

यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तालासुरामध्ये राष्ट्रीय गीतांचे गायन केले. मुलांच्या या सादरीकरणाचे उपशिक्षणाधिकारी आंगणे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे कलाशिक्षक चंदन गोसावी यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी मानले.