
सावंतवाडी : ‘अंदमानातील क्रांतिकारक’ या पुस्तकातून त्या काळातील क्रांतिकारकांची स्थिती दाखवण्याचे कार्य, त्यांची स्थिती समजून घेण्याचे काम डॉ. रुपेश पाटकर यांनी केले आहे. आपल्याला भगतसिंह, सावरकर माहिती आहेत. परंतु याव्यतिरिक्त जे क्रांतिकारक होते ते अज्ञात होते. अंदमानात शिक्षेवर गेलेला प्रत्येक क्रांतिकारक हा तेवढाच महान होता. डॉ. पाटकर यांनी अंदमानातील इतिहासाला उजाळा दिला. त्यांच्या या लिखाणाबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर यांनी केले.
मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर लिखित व मनोविकास प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘अंदमानातील क्रांतिकारक’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर, प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत दत्ता देसाई, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले सेवानिवृत्त माहिती संचालक आणि लोकराज्यचे माजी संपादक सतीश लळीत, लेखक डॉ. रुपेश पाटकर, श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.
डॉ. पाटकर म्हणाले, अंदमानातील क्रांतिकारक हे पुस्तक विजयकुमार सिन्हा यांच्या ‘इन अंदमान द इंडियन बॅस्टील’ या पुस्तकावर आधारित आहे. अंदमानात गेलेले क्रांतिकारक हे शिक्षित होते. परंतु त्या काळातही अंदमानात जाऊन उठाव करण्याची भूमिका घेतात ही माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट होती. क्रांतिकारकांचा हा लढा आपण लोकांसमोर आणला पाहिजे. आपल्या इतिहासाचे संचित पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्यालाच करायचे आहे. आज आपण अशा संक्रमणकाळात आहोत जिथे जुनी सांस्कृतिक मूल्ये ढासळत आहेत आणि नवी मूल्ये अजून आकाराला आलेली नाहीत. अशावेळी प्रत्येक संवेदनशील माणसाने हे संचित पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार राजेश मोंडकर यांनी केले. ते म्हणाले, या आधीही डॉ. पाटकर यांनी ‘कलर्स ऑफ प्रिझम’ नावाचे पुस्तक लिहिले. विदर्भात शेतकऱयांसाठी काम करणाऱया अरुण फरेरा यांना दहशतवादी ठरवून तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांच्या अनुभवावर आधारित ‘कलर्स ऑफ प्रिझम’ डॉ. पाटकर यांनी अनुवादित केले. आता ‘अंदमानातील क्रांतिकारक’ हे दुसरे पुस्तक असून अंदमानातील क्रांती नव्या पिढीसमोर नेण्याच्या दृष्टीने मांडणी त्यांनी केली आहे.
हे पुस्तक केवळ अनुवाद नसून डॉ. पाटकर यांनी आपण ऐकलेले, वाचलेले अनुभवही मांडले आहेत. आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. अशावेळी अंदमनातील क्रांतिकारकांचे कार्य जनतेसमोर पुस्तक रुपातून आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे. डॉ. पाटकर यांचे आजपर्यंतचे लेखन समाजप्रबोधनाच्या हेतूने केले आहे. लेखक म्हणून आपण जी भूमिका घेतो, ती वास्तवातही जगावी लागते. अन्यथा लेखकाला समाजाला सामोरे जाताना प्रश्न निर्माण होतात, असेही ते म्हणाले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत गोवा येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश गावस, पणदूर वृद्धाश्रमाचे संदीप परब, अनिता पाटकर, लोककला अभ्यासक प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मराठे यांनी केले. या कार्यक्रमाला सावंतवाडी गोव्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.