
सावंतवाडी : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथिल मिलाग्रीस हायस्कूलच्यावतीने 'आझादी का अमृत महोत्सव' मोहिमे अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन केले होते. देशभक्ती आणि देशप्रेम जनमानसात जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात १०० विद्यार्थी आणि ५० शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. यातील १२५ फुटी लांबीचा तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला.
या रॅलीची सुरुवात सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत निर्माण भवन येथून झाली. ही रॅली जगन्नाथराव भोसले उद्यानामार्गे पुढे सरकली. मोती तलाव काठावरून मार्गक्रमण करत ही रॅली केशवसुत कट्ट्याजवळील शिवरामराजे पुतळ्यापाशी पोहोचली. या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. १२५ फुटी लांब तिरंगा ध्वज या रॅलीचे खास आकर्षण ठरला. या रॅलीच्या माध्यमातून मिलाग्रीस हायस्कूलने समाजात देशभक्तीचा संदेश पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या कार्यक्रमात सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग होता. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर, मराठी प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी, इंग्लिश प्रायमरीच्या पर्यवेक्षिका क्लिटा परेरा, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.