
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विघ्नहर्त्याच्या ४२व्या वर्षीच्या आगमन मिरवणुकीने चिपळूण शहरात उत्साहाची लाट उसळली. रस्त्यांवर उसळलेली भक्तांची गर्दी, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि गणेशभक्तीच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरले चिपळूणमधील रीलस्टार्स व कंटेंट क्रिएटर्स यांची उपस्थिती. त्यांनी टिपलेल्या क्षणांमुळे खेर्डीचा विघ्नहर्ता सोशल मीडियावर ट्रेंडिंग ठरला आहे.
यंदा मंडळाने आयोजित केलेल्या फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला विशेष वाव मिळाला.
मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्धतेचा आदर्श ठेवत सर्व मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशे, वेशभूषा व भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात विघ्नहर्त्याचं स्वागत केलं.
या वर्षी मंडळाने ‘परंपरेला नवसंजीवनी’ हा संदेश देत जुन्या पद्धतींचं जतन करत नव्या पिढीला उत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न केला. चिपळूणकरांनी या उपक्रमाला मनःपूर्वक दाद दिली.
खेर्डीच्या विघ्नहर्ता मंडळाची मिरवणूक ही केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून चिपळूणच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक बनली असल्याचं या सोहळ्यातून अधोरेखित झालं.