सिंधुदुर्ग आरोग्य सेवेत स्वयंपूर्ण व्हावा हाच आमचा निर्धार

नेरूरमध्ये 'महाआरोग्य शिबिराचे' शानदार उद्घाटन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 28, 2026 17:56 PM
views 65  views

कुडाळ : "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोवा, बेळगाव किंवा मुंबईला जावे लागू नये, तर त्यांना आपल्याच जिल्ह्यात सक्षम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था इतकी बळकट करायची आहे की, भविष्यात कोल्हापूर, पुणे आणि बेळगावचे रुग्ण उपचारासाठी सिंधुदुर्गात येतील," असा ठाम विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे आयुष्मान भारत आणि बेळगाव येथील के. एल. ई. (KLE) हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मोफत महाआरोग्य शिबिराचे' उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

या शिबिरासाठी बेळगावच्या के. एल. ई. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफचा ताफा नेरूरमध्ये दाखल झाला आहे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयातील अद्ययावत ओटी (Operation Theatre) विभागाचे देखील लोकार्पण करण्यात आले.

दुर्गम जिल्हा असल्याने डॉक्टरांची कमतरता भासते. ही अडचण दूर करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसना विशेष 'इन्सेंटिव्ह' देऊन जिल्ह्यात आणण्याबाबत सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे.

आयुष्मान भारत योजनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रेसर ठरल्याबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. 'तक्रारी कमी आणि सेवा जास्त' ही या योजनेची नवी ओळख निर्माण झाली आहे. या रुग्णालयाकडे येणारा रस्ता चांगला करून देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. सिंधुदुर्ग सुदृढ व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कसाल येथील मेडिकल कॉलेज व इतर रुग्णालयांच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू केले आहेत, त्याला आधुनिक यंत्रणेची जोड दिली जात आहे. "जिल्ह्याचा विकास करायचा आहे, दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे; पण जर आपण लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देऊ शकलो नाही, तर या विकासाचा उपयोग नाही. जिल्ह्याच्या आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे."

— नाम. नितेश राणे, पालकमंत्री

या कार्यक्रमाला आयुष्मान भारतचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, डॉ. प्रभू, जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन), आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या शिबिराला नेरूरसह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यावरून आरोग्य सेवांची गरज आणि या शिबिराचे महत्त्व अधोरेखित झाले.

पालक मंत्री, नितेश राणे, आयुष्यमान भारत अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, जी प अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, सीईओ रवींद्र खेबूडकर, डॉ. माधव प्रभू, अदिती पै, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, रुपेश पावसकर जी प सदस्य, आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, डॉ. श्रीपाद पाटील, तहसीलदार सचिन पाटील, प्रांत- ईश्वर्या काळुशे, डॉ. अजित शिरोडकर उभयता, डॉ. माधव प्रभू (प्रो. K L E), डॉ. अल्लमप्रभू , दीपलक्ष्मी   पडते  जी प सदस्य, काका कुडाळकार, संजय पडते, नीता राणे,रुपेश पावसकर जी प सदस्य, आरती पाटील जी प सदस्य , नागेश आईर, भक्ती घाडीगावकर (नेरूर सरपंच ), माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, संध्या तेरसे भाजप उप महिला ज़िल्हाध्यक्ष, गजानन कांदाळगावकर,चेअरमन उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.