महिलेचे मंगळसूत्र हिसकावून काढला पळ !

नागरिकांच्या सतर्कतेने चोरटे पोलिसांच्या ताब्यात
Edited by: ब्युरो
Published on: January 13, 2024 13:15 PM
views 824  views

रायगड | शशिकांत मोरे :  चणेरा येथे जात असलेल्या महीलेचे चालत्या दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पुण्यातील मूळशीच्या तीन चोरट्यांना या ठिकाणी नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले.यानंतर या तिघांना रोहा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.मात्र या घटनेने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.

     रोहा पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,१२ जाने रोजी दु.४ दरम्यान रोहा रेवदंडा रस्त्यावरील खुटल गावातून फिर्यादी संगीता दिलीप महाले (४८)ही महिला चणेरा येथे जात होती.बंटी केंद्रे यांच्या घरासमोर रोहा बाजूकडून दुचाकीवर येणाऱ्या तीन इसमांनी संगनमताने ३० हजार रु.किमतीचे सोन्याचे एकसरी मंगळसूत्र आणि त्यामध्ये दोन शिंपल्यांच्या आकाराचे डाव आणि २४ मणी त्याचबरोबर असलेले काळे, पिवळे मणी असा किमान ५ ग्राम वजनाचे मंगळसूत्र जबरीने हिसकवले.दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी महीलेचे मंगळसूत्र हिसकावून याठिकाणाहून पळ काढला.याठिकाणी फिर्यादी सौ.महाले यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तिघापैकी दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने हाताने फिर्यादीस धक्का दिल्याने त्या रस्त्यात जमिनीवर खाली पडल्या.त्यांच्या कमरेला मुका मार बसला असून मंगळसूत्र हिसकताना मानेजवळ जखम झाली आहे.

     दरम्यान गावातील काही तरुणांनी त्या दुचाकी वरील चोरट्यांचा पाठलाग करून त्या तिघांना पकडले.यामधे राजेश हरीचंद्र राजपूत,सचिन तानाजी राजपूत,अरुण कैलास राजपूत या व्यक्ती पुण्यातील मुळशी येथील रहिवासी असल्याचे समोर आले.पकडण्यात आलेल्या या तिन्ही चोरट्यांना येथील नागरिकांनी रोहा पोलिसांच्या स्वाधीन केले.यांच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गु.र.नं ०९/२०२४ भा.द.वी.सं.कलम ३९४,३४ अन्वये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर घटनेतील राजेश हरीचंद्र राजपूत हा इसम अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले असून सचिन राजपूत व अरुण राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास रोह्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई व्ही.एस. वायंगणकर यांसह सहकारी अधिक तपास करीत आहेत.