
सावर्डे : दहावी बारावी नंतर सगळेच फक्त डॉक्टर- इंजिनिअर बनू शकणार नाहीत. मग अगोदरच विचार करून व्यावसायिक शिक्षण घेतले तर आयुष्यातील पुढची परवड थांबेल. आपली आवड,स्वप्ने निश्चित करा. आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. कौशल्य आणि ज्ञानासाठी दुसर्याची कॉपी करायचा प्रयत्न करू नका. "दुसर्याचे कॉपी केलेले ज्ञान माणसाला कधीच मोठं करीत नाही! त्यांचाकडून शिका, ते ज्ञान आत्मसात करा! तेच ज्ञान तुमचे भविष्य घडवेल" असे बोधपर वक्तव्य जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज " मी कसा घडलो" या विषयावर व्याख्यान देताना केले. शिक्षणमहर्षी स्व.गोविंदराव निकम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सव कार्यक्रम प्रसंगी, त्याच्या स्मृतिगंध गोविंदरावजी निकम स्मारक सावर्डे येथे बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, जीवनात अनेक अडचणी येत असतात त्या सर्व अडचणींचा सामना करून आपले उज्वल भविष्य घडण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मीही खेड्यातील शेतकरी कुटुंबातील, गाई म्हशी च्या मागे राखण करीत अभ्यास केला आणि शिक्षण घेऊन तुमच्या समोर बोलतो आहे.आपल्याकडे शिक्षणात इच्छाशक्तीचा अभाव असल्याने यशस्वी होता येत नाही.
स्व.गोविंदरावांनी ५० वर्षांपूर्वी अवघ्या २२ व्या वर्षी या गोष्टींचा विचार केला होता म्हणूनच सह्याद्रि शिक्षण संस्थेचे साम्राज्य उभे दिसत आहे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता, व्यावसायिक शिक्षणाचा संस्थेने केलेला विचार दिसतो. आपण काल आलो संस्थेचा परिसर पाहिला , विज्ञान आणि कला प्रदर्शन ही पाहिले आणि खूप आनंद झाला, असेही गोविंदरावांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, परिस्थितीमुळे ५ बहिणी, दोन भाऊ आणि आईवडील असे सात माणसांचे कुटुंबाची, अवघ्या दिड एकर कोरडवाहू जमिनीतील शेतीवर भूक भागत नसल्याने, चौथीत मेरीट मध्ये येऊनही त्यांच्या वडिलांना, त्याकाळी त्यांनी पुढे शिकावे असे वाटत नव्हते. कारण त्यांना कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची चिंता होती. हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवताना, " बाप म्हणजे बाप असतो" असे उद्गार त्यांनी काढले.
मात्र शाळेतील शिक्षकांच्या आग्रहाने आपण शाळेत प्रवेश घेतला, पण दहावी पर्यंत आपण जून महिन्यात शाळेच्या सुरुवातीला कधीच झालेत जाऊ शकलो नाही. कारण वडिलांचे म्हणने होते , आधी शेती. पेरणी, खुरपणी ची कामे झाली की, १५ ऑगस्ट पासून आपली शाळा पुढे सुरु व्हायची. घरातील शेतीसोबत इतरांच्या शेतात पेरणीची मजूरी, रविवार मजुरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होतो.
आपला अभ्यास हा सुर्य उगवला की सुरु आणि सुर्य मावळला की बंद, कारण रॉकेल, गोडेतेलचा किंवा रात्री दिवा लावून अभ्यास करण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. दुष्काळाच्या काळात मजूरी म्हणून सुकडी मिळे त्यावर कुटुंबाची गुजराण सुरु होती. आपण आणि आई ने तिखट मीठाच्या पेजेवर घालवले. या काळात त्यांची बहिणीने पोट न भरल्याने माती खाल्ली हे लक्षात न आल्याने तीचे पुढे पोट फुगून ती दगावली , हा भावनिक प्रसंग सांगताना आर्थिक परिस्थिती नसल्याने तिला वैद्यकीय उपचार करता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सातवीत असताना गावातील एका एमबीबीएस झालेल्या तरुणाचा सत्कार पाहून आपलाही असा सत्कार होण्यासाठी एमबीबीएस ला प्रवेश घ्यायचे मनात ठरवले होते. पुढे एमबीबीएस ला पुस्तक नसल्याने ग्रंथालयात ग्रंथपाल हाकलून बाहेर काढे पर्यंत अभ्यास करित नोट्स काढायच्या आणि त्याच्या आधारेच पुढे अभ्यास केला. अभ्यासाचे तंत्र सांगताना ते म्हणाले. कोणताही विषय असो, तो प्रथम वाचा, नंतर डोळे बंद करुन आठवा. आणि मग पुन्हा वाचा आणि मग हे वाचलेले चांगले लक्षात राहते. सर्वांचा मेंदू सारखाच मात्र गुण कमी जास्त, याचे कारण इच्छाशक्ती आणि कष्ट कमी पडतात. ज्ञान आणि निष्ठा असेल तर लोक आपल्याकडे येतात.
ते पुढे म्हणाले, एमबीबीएस नंतर डॉ. लहाने यांच्या दोन्ही किडण्या फेल असल्याचे लक्षात आले. कुटुंबातील १८ व्यक्ती किडनी देण्यास तयार होत्या. मात्र त्यांच्या आईची किडनी मॅच झाली, हा प्रसंग आणि आईच्या मायेचे वर्णन करताना, आईचा डॉक्टरांशी झालेला संवाद त्यांनी आईच्याच भाषेत मांडला. आई ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना म्हणाली, " माझी किडनी काढ, माझ्या तात्याला बसव, चलती का बघ? नाय चलली तर दुसरी काढ! माझा तात्या जगला पाहिजे!" ती आई होती, सर्वांची आई अशीच असते". किडनी ऑपरेशन होऊन आज ३० वर्षे झाली आपण अजून आहोत. हे तिचीच इच्छा आणि आशिर्वाद आहेत. आज अन्न वस्त्र निवारा यापेक्षा मोबाईल ही गरज झालेली आहे. पण त्याचा अतिरेक वाढल्याने मेंदू कॅन्सर प्रमाण वाढत आहे. डोळ्यांचे विकार वाढत आहेत. डोळे कोरडे पडतात. चष्म्याचे नंबर वाढत आहेत. मान वाकडी होते, पाठ दुखी, गुडघे दुखी आदी विकार वाढत आहेत.
तेव्हा मोबाईल शरीरापासून दूर ठेवून कमी वेळ वापर करा. ब्लूटूथ किंवा इअर फोन वापरा. चार्जिंग बेडरूम ऐवजी लिव्हिंग रुम मध्ये करा. डोळ्यांसाठी अ जीवनसत्व आवश्यक असल्याने, आहारात गाजर, पपई, पालेभाज्या, शेवगाशेंग भाजीचा समावेश करा असा सल्ला ही त्यांनी दिला. हात उंचावून जोरात एक मिनिट टाळ्या वाजवल्याने, एक दिवसाने आयुष्य वाढते, असा योगाचा संदर्भ देत त्यांनी उपस्थित टाळ्या वाजवण्यासही उद्युक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक मंदार भारदे, ऑलिव्हर मर्चंड, संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, डी वाय एस पी राजेंद्र राजमाने, पोलीस उपनिरीक्षक जयंत गायकवाड, सचिव महेश महाडिक, विश्वस्त शांताराम खानविलकर, मानसिंगराव महाडिक, चंद्रकांत सुर्वे,मारुतराव घाग,संस्थेचे सर्व पदाधिकारी,उद्योजक प्रशांत निकम, माजी प्राचार्य व जीवन कला गौरव पुरस्कार प्राप्त प्रकाश राजेशिर्के उपस्थित होते. तर कार्यक्रमाला उद्योजक प्रदीप निकम, माजी सभापती पूजाताई निकम, युगंधरा राजेशिर्के, अंजलीताई चोरगे, डॉ. निखिल चोरगे,निकम कुटुंबातील सर्व सदस्य, सावर्डे गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस जयद्रथ खताते,तालुकाध्यक्ष अबुशेठ ठसाळे, दशरथ दाभोळकर,राकेश चाळके, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचक्रोशीतील राजकीय,क्रीडा, सांस्कृतिक शैक्षणिक, सहकार, क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक,पंचक्रोशीतील कार्यकर्ते,पालक,ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे आमदार शेखर निकम यांनी स्वागत केले. याप्रसंगी कर्तव्यपथ या माहितीपटाचे उद्घाटन डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते तर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या ॲडव्हान्स वेब न्यू पोर्टल चे प्रकाशन उद्योजक मंदार भारदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सह्याद्री शिक्षण संस्था प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झाली व ती आजपर्यंत तेवढ्याच नावलौकिकाने व सचोटीने मार्गक्रमण करत असून यासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी ऋण व्यक्त केले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी कला,क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारी बद्दल समाधान व्यक्त करून यापुढे विद्यार्थ्यांच्यातील गुणवत्ता टिकून राहण्यासाठी प्रत्येक परिवारातील घटकांने प्रयत्न करण्याचे आवाहन आपल्या प्रास्ताविकात आमदार शेखर निकम यांनी केले. संस्थेसमोर असणाऱ्या भविष्यातील विविध योजनांचाही परामर्श त्यांनी घेतला व सामाजिक भान जपणारा विद्यार्थी निर्माण करण्यावर सह्याद्री मुख्यत्वे भर देत आहे याची माहिती उपस्थित त्यांना दिली.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोटच्या राजे सामाजिक प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीचे भान जपून अनेकांना अडीअडचणीत सहकार्य केले आहे त्यांच्या या कार्याची देखील घेऊन याप्रसंगी .रु.25000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन 2025 चा शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत म्हणाले, रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण इत्यादी कामापासून सुरू झालेले प्रतिष्ठान आज गड संवर्धन पुरातन वस्तूंची जतन व त्यांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यासाठी झगडत आहे त्याला काही प्रमाणात यशही आले आहे. गडकिल्ल्यांवर असणाऱ्या अनेक वास्तूंचे जतन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून त्यांचा आदर्श समाजामध्ये रुजवण्याचे कार्य करत आहे. ध्येयाने प्रेरित होऊन सर्वसामान्य कुटुंबातील तरुण एकत्र येऊन हे काम अविरतपणे करत आहेत याचा आम्हाला आनंद आहेच मात्र अशा मोठ्या संस्थेने आमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या केलेला सन्मान नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन आणि निवेदन तुषार बिजीतकर आणि हरिश्चंद्र भागडे यांनी केले.