पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत 'सागर मित्र' नियुक्तीस शासनाचा हिरवा कंदील !

मत्स्य संपदा योजनेचे कोकण संयोजक रविकिरण तोरस्कर यांची माहिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 16, 2022 11:21 AM
views 266  views

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार ,परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक आर्हता असणाऱ्या  युवक युवतींची कंत्राटी पद्धतीने २०२१-२०२२ या कालावधीसाठी भरती करण्यात आली होती. परंतु सन २०२२- २३ या कालावधीत सागर मित्र या पदासाठी नियुक्ती झालेली नव्हती. त्यामुळे मत्स्य व्यवसायात इच्छुक असलेल्या व्यक्तींना योजनेची माहीत व लाभ मिळविण्यात अडचणी येत होत्या.

सदर नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी अतुल काळसेकर, उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या माध्यमातून मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुगंटीवार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा चालू होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र शासनाने  ०९ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून 'सागर मित्र'  नियुक्तीस हिरवा कंदील दाखविला आहे.


सदर अध्यादेशद्वारे पूर्वी काम केलेल्या सागर मित्रांना नियुक्त्या देणे चालू झाले आहे. सध्या सदर सागर मित्रांना चार महिन्यासाठी नियुक्त केले जाणार असून भविष्यात त्यांचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तरी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्यांनी सागरमित्र यांच्याशी संपर्क साधावा. तसेच पूर्वी काम करत असलेल्या सागर मित्र यांनी अथवा नवीन इच्छुकांनी संबधित जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन रविकिरण तोरसकर, कोकण संयोजक, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, भारतीय जनता पार्टी यांनी केलं आहे.