
सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर शासनाने आता १५० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम सुरू केला आहे. यात कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका अद्यावत केल्या जाणार आहेत. तसेच पदोन्नती, बिंदूनमावली तयार करणे, बदली आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर सध्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका तपासण्यासाठी सांगण्यात आले असून येत्या दोन दिवसांत सामान्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करून घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुधाकर ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. खेबुडकर म्हणाले की, १५० दिवसांचा कलमी कार्यक्रम शासनाने ठरवून दिला आहे. त्यानुसार सध्या काम सुरू आहे.
४९ ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नोकरीला लागलेले, नियुक्ती पत्र मिळालेले आणि भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र ४९ ग्रामसेवकांना या योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी सांगितले.
दिव्यांगांच्या समस्या आता प्रत्येक महिन्यात सुटणार
दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये आता प्रत्येक महिन्याच्या १५ तारीखला प्रत्येक विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच त्या लागलीच सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..
आदिवासी कुटुंबाच्याही समस्या सोडविणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८१६ आदिवासी लोक आहेत त्यांच्याही समस्या सोडविण्याकडे भर देण्यात आला आहे. त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याकडे आपले लक्ष असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सीईओ श्री. खेबुडकर यांनी सांगितले.