LIVE UPDATES

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची पुन्हा फेरनिवड

सुशांत नाईक यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 13, 2026 16:42 PM
views 17  views

सावंतवाडी : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत पक्षबांधणीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची पुन्हा फेरनिवड केली असून युवासेनेचे आक्रमक नेते सुशांत नाईक यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्यरत व्हावे, अशा सूचनाही पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत.

मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सावंतवाडी मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीविरोधात जोरदार लढा उभारण्यात रुपेश राऊळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करणे, विविध निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार रिंगणात उतरवणे आणि कोणतीही जागा बिनविरोध होऊ न देणे, या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडी मतदारसंघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे, युवासेनेच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सुशांत नाईक यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. वेळोवेळी पालकमंत्री आणि खासदारांवर थेट टीका करत त्यांनी शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना युवासेनेकडून मुख्य शिवसेनेत आणून कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी निवडणुकांमध्ये सावंतवाडी आणि कणकवली या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.